|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एलपीजी सिलिंडर जीएसटीने महागला

एलपीजी सिलिंडर जीएसटीने महागला 

जीएसटी, अनुदान कपातीने 32 रुपयांपर्यंत वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

वस्तू व सेवा कर लागू करण्यात आल्याने त्याचा परिणाम स्वयंपाकघरात झाल्याचे दिसत आहे. जीएसटी आणि अनुदानात कपात करण्यात आल्याने एलपीजी सिलिंडर महाग झाला आहे. काही राज्यांत घरगुती सिलिंडरच्या किमती 32 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. प्रत्येक राज्यांनुसार या दरात होणारी वाढ वेगवेगळी असेल. याव्यतिरिक्त नवीन ग्राहकांना 2 वर्षांचा अतिरिक्त देखभाल खर्च, उपकरणे बसविण्याचा खर्च आणि व्यवस्थापन खर्च द्यावा लागणार आहे. नवीन जोडणीसाठी आता कागदपत्रांची आवश्यकता भासणार असल्याने हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

एलपीजीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. यापूर्वी अनेक राज्यांत हरित इंधन कर आकारण्यात येत नव्हता. या राज्यांत 2 ते 4 टक्के व्हॅट होता. आता जीएसटी लागू करण्यात आल्याने ज्या राज्यांत इंधन कर आकारण्यात नव्हता, त्या राज्यांत एलपीजी 12 ते 15 रुपयांनी महाग होणार आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी प्रत्येक राज्यात किती इंधन कर आणि जीएसटीमध्ये अंतर असेल, त्यानुसार आता सिलिंडर महाग होईल. सरकारकडून अनुदानात कपात करण्यात आल्याने ग्राहकांच्या खात्यात कमी पैसे गोळा होतील. अशा प्रकारे ग्राहकांना प्रतिसिलिंडरमागे 25 ते 32 रुपयांचा फटका बसणार आहे.

जीएसटीने व्यावसायिक सिलिंडर मात्र स्वस्त होणार आहे. काही राज्यांत 8 टक्के अबकारी आणि 14.5 टक्के व्हॅट आकारण्यात येत असल्याने 22.5 टक्के कर भरावा लागत होता. आता मात्र 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल.