|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नितीश कुमार यांच्याशी चर्चा करणार राहुल गांधी

नितीश कुमार यांच्याशी चर्चा करणार राहुल गांधी 

तणाव दूर करण्याचा प्रयत्न : बिहार सरकारला धोका नाही

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या उमेदवाराला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने समर्थन नाकारले. यामुळे काँग्रेस आणि संजदमधील संबंध बिघडल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही पक्षातील तणाव दूर करण्यासाठी नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत नितीश यांची बदललेली भूमिका राहुल यांना चिंतेचे कारण वाटत नाही.

राहुल यांच्या हस्तक्षेपानंतरच काँग्रेसने नितीश यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली. नितीश सोबत राहतील आणि बिहारमधील महाआघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास राहुल यांना वाटत आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नितीश यांची भूमिका फारशी महत्त्वपूर्ण नाही. लालू प्रसाद यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठीच नितीश वेगळी भूमिका घेत आहेत. लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील चौकशीमुळे आघाडीवर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे राहुल यांचे मानणे आहे.

राहुल गांधी सुटी व्यतित करण्यासाठी विदेशात गेले होते. राहुल विदेशात असतानाच नितीश यांच्या बदललेल्या भूमिकेपोटी दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला होता. राहुल यांनी विदेशातून परतताच संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. राहुल यांनी आपल्या दूताद्वारे नितीश यांच्यापर्यंत संदेश पोचविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या उमेदवाराची चर्चा करता-करताच नितीश कुमार यांनी रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. 2019 साली विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांनाच यामुळे फटका बसला. बिहारमध्ये लालू आणि काँग्रेसच्या समर्थनाने चाललेल्या महाआघाडीच्या सरकारवर यामुळे धोका निर्माण झाल्याचे चित्र  समोर आले. याचदरम्यान नितीश यांच्या भूमिकेमुळे नाराज काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी संजदवर जोरदार टीका केली तर नितीश यांचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले. स्वतः नितीश यांनीदेखील आपण काँग्रेसचे मिंधे नसल्याचे वक्तव्य केले
होते.

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा आणि त्यांच्या उमेदवारी अर्जावेळी राहुल हे विदेशात होते. राहुल यांनाच नितीश यांच्यासोबतच्या काँग्रेसच्या आघाडीसाठी मुख्य कारण मानले जाते. 2019 साली जर विरोधकांमधून कोणत्याही नेत्याला पंतप्रधान करण्याची स्थिती निर्माण झाली तर राहुल यांची पहिली पसंती नितीश असतील असे जाणकारांचे मानणे आहे.