|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रतिपंढरपूर कोडणीत विठ्ठलभक्तांचा महापूर

प्रतिपंढरपूर कोडणीत विठ्ठलभक्तांचा महापूर 

वार्ताहर/ निपाणी

प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱया कोडणी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्यानिमित्ताने मंगळवारी विठ्ठलभक्तांचा महापूर आल्याचे दिसून आले. भाविकांच्या दिवसभर दर्शनासाठी लागलेल्या रांगातून संपूर्ण कोडणी गाव विठ्ठलमय बनले होते. निपाणीसह ग्रामीण भागात असणाऱया सर्वच विठ्ठल व ग्रामदैवत मंदिरांमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसरच विठ्ठलमय झाला होता. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरांमध्ये वारकरी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारीला लागले होते. मंदिराची रंगरंगोटी, आकर्षक सजावट करण्यात विठ्ठलभक्त दंग झाले होते. मंगळवारी सकाळपासून टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशी सोहळय़ाला सुरवात झाली. विठ्ठल-रुक्मीणीच्या मूर्तीला अभिषेक घालून विधीवत पूजा बांधण्यात आली होती. दिवसभर सुरू असणाऱया हरिनामाच्या गजराने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कोडणी येथे चिकोडी तालुक्यासह बेळगाव व कोल्हापूर जिल्हय़ातून याठिकाणी विठ्ठलभक्त आषाढी एकादशीच्यानिमित्ताने हजेरी लावतात. मंदिरात सकाळी सागर साळवे दांपत्याच्या हस्ते पूजाविधी करून उत्सवाला सुरवात करण्यात आली. भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन विविध मंडळांनी दिवसभर नियोजन केले. मंदिर परिसरात विविध दुकाने थाटण्यात आली होती. भाविकांना ये-जा करण्यासाठी आगारसह खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. बुधवारी द्वादशीला उपासाच्या सांगतेनिमित्त महाप्रसादाचे वितरण करून आषाढी सोहळय़ाची सांगता करण्यात येणार आहे.

Related posts: