|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगाव नगरपालिका आत्ता कंत्राटपद्धतीने कामगार घेणार

मडगाव नगरपालिका आत्ता कंत्राटपद्धतीने कामगार घेणार 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव नगरपालिकेला कामगार अपुरे पडत असल्याने, या पुढे रोजदारीवर कामगार घेण्याऐवजी ते कंत्राटपद्धतीने घेण्याचा निर्णय काल झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रोजदारीवर कामगार घ्यायचे झाल्यास, पालिका संचालनालयाकडून त्वरित मान्यता मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी दिली.

कंत्राटपद्धतीने कामगार घेतल्यास, जेव्हा जेव्हा कामगाराची गरज भासेल, तेव्हा कामगार घेता येईल व कामगाराची कमतरता भासणार नसल्याचे नगराध्यक्षा बैठकीत बोलताना म्हणाल्या. हा ठराव पालिका संचालनालयाला पाठविण्यात येईल. त्याला मान्यता मिळाल्यानंतरच ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेकायदा व्यवहार वाढलs

मडगाव नगरपालिका क्षेत्रात बेकायदा व्यवहार वाढल्याचे काल नगरसेवकांनीच नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिले. मंगळवारी रात्री शहरातील लीली गार्मेन्ट जवळ एका बेकायदा गाडय़ा थाटण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक यांनी पालिका बैठकीत दिली व या बेकायदा गाडय़ावर कारवाई करावी अशी मागणी केली.

त्यानंतर नगरसेवक रूपेश महात्मे, राजू उर्फ हॅडली शिरोडकर यांनी ही बॉम्बे कॉफे समोरील एका बारचे दुकानात रूपांतर केले असून त्याला शटर बसविण्यात आल्याची माहिती दिली व या बेकायदेशीर गाडे वजा दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षांनी मार्केट निरीक्षकांना या गाडय़ाची पहाणी करून कारवाई करण्याचा आदेश दिला.

दरम्यान, लीली गार्मेन्ट समोर थाटण्यात आलेला गाडा हा एका नगरसेवकाच्या आशीवार्दानेच थाटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पालिका कोणती कारवाई करतात याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

अगोदर 7.70 लाखाची थकबाकी द्या

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर होणाऱया सामन्याच्या वेळी मडगाव पालिकेने नेहमीच सहकार्य केले आहे. या पूर्वी लुसोफोनिया व इतर सामन्याच्यावेळी सेवा दिली. येथील कचरा हटविला, स्वच्छतेला प्राधान्य दिले, त्यावर 7.70 लाख रूपये खर्च आला. पण, गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून अद्याप हा खर्च मिळालेला नाही. अगोदर ही थकबाकी द्यावी, त्यानंतरच फिफा वर्ल्ड कप 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेला सेवा पुरविण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

फिफा वर्ल्ड कप 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेसाठी मडगाव पालिकेने आपली सेवा द्यावी असा पत्रव्यवहार पालिका संचालनालयाने केला आहे. त्यावर वरील निर्णय घेण्यात आला.

पालिकेचे सेनिटरी इन्स्पेक्टर विराज आराबेकर हे नगरसेवकाचा फोन घेत नाही व सहकार्य करीत नाही असा आरोप नगरसेवक राजू शिरोडकर यांनी केला तर पालिकेचे बरेच कर्मचारी डय़ुटीवर हजर नसतात असा मुद्दा देखील यावेळी पुढे आला. तेव्हा, या प्रकरणी कर्मचाऱयांनी नगरसेवकांना सहकार्य करावे व डय़ुटीवर असताना इतर ठिकाणी जायचे झाल्यास त्या संदर्भातील नोंदणी ठेवावी अशी सूचना नगराध्यक्षांनी केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक हे उपस्थित होते, त्यांच्याकडे मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त ताबा आहे.