|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ट्रम्प-पुतीन भेट : फलनिष्पतीची शक्मयता कमी

ट्रम्प-पुतीन भेट : फलनिष्पतीची शक्मयता कमी 

जगातील गरिबी, दहशतवाद, प्रदूषण, स्थलांतर, आरोग्य, अण्वस्त्र, युद्ध विषयक समस्या सुटावयास हव्यात तर काय झाले पाहिजे तर अमेरिका, चीन, रशियासारख्या बलाढय़ राष्ट्रांनी यासाठी एकत्र येऊन एक परिणामकारक किमान समान कार्यक्रम आखून तो राबवावयास हवा असे कोणीही म्हणेल. परंतु असे होत नाही हे खरे दुर्दैव आहे. याचे कारण हे की, बलाढय़ राष्ट्र नेत्यांची स्वराष्ट्र स्वार्थप्रेरित मनोवृत्ती जागतिक कल्याणावर नेहमीच मात करीत आली आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनी हम्बुर्गमध्ये जी 20 राष्ट्रांची परिषद सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांची भेट होईल. या भेटीबाबत गेला आठवडाभर जगभरात चर्चा सुरू आहे. दोन प्रभावी राष्ट्रांच्या अध्यक्षांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे त्यातून काय निष्पन्न होणार हे चर्चेचे मुख्य सूत्र आहे. तथापि, या दिग्गजांच्या भेटीतून जगासाठी काहीतरी चांगले निष्पन्न होईल असा आशावाद बाळगणाऱयांना हे आधीच सांगावयास हवे की अशी शक्मयता अत्यंत कमी आहे. काही मुद्यांवर उभयतांचे एकमत झाले तरी ते पुढे किती टिकेल याची शाश्वती उभय राष्ट्रांचा पूर्वेतिहास देत नाही. सीरिया संदर्भातील आयसीस विरुद्ध सामूहिक कारवाईबाबत आरंभी एकमत झालेल्या या दोन्ही राष्ट्रांचा आडमुठेपणा पुढे कसा आड आला व त्यातून या संयुक्त कारवाईची कशी वासलात लागली हे उदाहरण ताजेच आहे. तथापि, या निमित्ताने प्रदीर्घ पार्श्वभूमी लाभलेल्या या दोन्ही राष्ट्रांचे संबंध आता कसे आहेत? त्यांच्यातील एकवाक्मयतेची शक्मयता फेटाळून टाकणारी ताणतणावाची कारणे कोणती यावर यानिमित्ताने चर्चा होणे आवश्यक आहे.

अमेरिकेत 2016 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणूक प्रक्रियेत रशियाने हस्तक्षेप केल्याचा प्रवाद अमेरिकेत अद्यापही प्रभावी आहे. अमेरिकन गुप्तचर खात्याने तर, पुतीन यांनी स्वतःच ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या बाजूने निवडणूक कशी वळेल यासाठी षड्यंत्र रचले असा निष्कर्ष काढला आहे. ट्रम्प यांनी निवडणूकपूर्व प्रचारात केलेली पुतीन व रशियाधार्जिणी भाषा सर्वसामान्य अमेरिकेन नागरिकांच्या पचनी पडलेली नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकन विधिमंडळात रशियावर अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप केल्याच्या अनुषंगाने नवे कडक निर्बंध लादणारे विधेयक द्विपक्षीय पाठिंब्याने मंजुरीसाठी आले आहे. ट्रम्प यांचा गट या विधेयकाच्या विरोधात असला तरी याबाबत आपण व्हेटो वापरला तर ट्रम्प यांच्या भोवतीचे रशियन पाठिंबाविषयक संशयाचे जाळे व त्याबाबतची चौकशी यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती ट्रम्प समर्थकांना आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे वरि÷ सल्लागार व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणूनही कार्यरत असलेले एच. आर. मॅकस्माटर स्वतः रशियाशी कोणतीही हातमिळवणी करण्याबाबत सावध व साशंक आहेत. दुसरीकडे रशियादेखील आपल्याबरोबर संबंध सुधारण्यात काहीसे स्वारस्य असलेली ट्रम्प ही एकमेव व्यक्ती अमेरिकन प्रशासनात आहे आणि इतर सारे मूलतः त्या विरोधात आहेत याची पूर्ण जाणीव आहे. अशी स्थिती असताना रशियाशी संबंध दृढ करण्याची कितीही इच्छा असली तरी ट्रम्प यांचे हात परिस्थितीने बांधलेले आहेत.

अमेरिका-रशिया संबंधात सध्या सीरियाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सीरियन युद्धात हे दोन्ही देश दोन वेगवेगळय़ा टोकांवर, वेगवेगळय़ा भूमिकेत उभे आहेत. आयसीसचा पाडाव करण्यावर दोन्ही राष्ट्रांचे मतैक्मय असले तरी असाद यांची राजवट टिकवण्यावर मात्र मतभिन्नता आहे. हल्लीच अमेरिकेने स्वबळावर आयसीसला भूप्रदेश व तेलावरील ताबा, दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत या संदर्भात सीरिया व इराकमध्ये बऱयापैकी रोखले आहे. रशियन मदतीची तिला गरज वाटलेली नाही. अशा स्थितीत दहशतवादाविरोधात रशियाशी युतीचे फायदे अमेरिकेच्या असाद राजवटीच्या अनुकूलतेशी निगडित तोटय़ांबरोबर तोलले जातील. आतापर्यंत अमेरिकेची भूमिका, असाद यांची सीरियातील हुकूमशाही अगणित नागरी मृत्यूस कारणीभूत ठरलेली, मानवाधिकारांचा सातत्याने भंग करणारी, अमेरिका विरोधी आहे अशी होती. त्यापासून फारकत घेणे ट्रम्प यांना अत्यंत कठीण आहे. याशिवाय सीरियन प्रश्नावर युती झाल्यास रशियाबरोबर अमेरिकेस गुप्त माहितीची देवाणघेवाण करावी लागेल. ती अमेरिका-रशियाचे सीरियातील राजवट स्वारस्य वेगवेगळे असल्याने जोखमीची ठरेल असे अमेरिकेस वाटते. ट्रम्प व पुतीन यांनी जागतिक दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी आघाडीचा वेळोवेळी उद्घोष केला असला तरी या संदर्भात अमेरिकेशी वाटाघाटी करताना पुतीन, आपल्या क्रिमिया व युपेनमधील अतिक्रमणाबाबत अमेरिकेने जे निर्बंध लादले आहेत ते दूर करण्याचा प्रस्ताव निश्चितपणे पुढे आणतील. या स्थितीत निवडणूक हस्तक्षेपाच्या निमित्ताने आणखी अधिक निर्बंध रशियावर लादू पाहणाऱया अमेरिकेस रशियाचा हा प्रस्ताव स्वीकारणे ट्रम्प यांची इच्छा काहीही असो, परंतु अशक्मय ठरणार आहे.

नाटो राष्ट्रांबाबत रशियाची भूमिका नेहमीच विरोधी राहिली आहे. युपेन व क्रिमियाबाबतीत या राष्ट्रांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेपानंतर हे वैमनस्य अधिकच तीव्र झाले आहे. मध्यंतरी पुतीन यानी नाटो राष्ट्रांनी रशियाच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करू नये अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला होता. दुसऱया बाजूस नाटो राष्ट्रांना आपल्या सीमारेषाजवळील रशियन कारवायांबाबत संशय व चिंता आहे. अशा स्थितीत नाटो राष्ट्रांचे निर्विवाद नेतृत्व करणाऱया ट्रम्प यांना आपल्या मध्य व पूर्व युरोपातील सहकारी राष्ट्रांना सांभाळण्यासाठी नाटोशी बांधीलकी आणि नाटो विरोधकांबाबतची भूमिका अधिक स्पष्ट करावी लागणार आहे. या अर्थात नाटो राष्ट्रे हा अमेरिका रशिया संबंधातील आणखी एक अडसर आहे.

इराणशी झालेला अणुकरार अबाधित ठेवण्यासाठी इराणचा निकटचा मित्र असलेला रशिया अमेरिकेस उपयुक्त असला तरी आंतरराष्ट्रीय अणुकराराची मनमानी मोडतोड करणाऱया उत्तर कोरियावर दबाव आणण्यास रशियाचा कितपत उपयोग होऊ शकेल याबाबत अमेरिका सांशक आहे. कारण उ. कोरियाचा पाठीराखा असणाऱया चीनशी रशियाची जवळीक अलीकडच्या काळात वाढली आहे. अलीकडेच पुतीन व शी जीनपिंग यांची संयुक्त बैठक मास्कोत संपन्न झाली. या बैठकीत उभय राष्ट्रप्रमुखांनी कोरियन द्वीपसमूहासंदर्भात एक सामायिक शांतता योजना साकार करण्यासंबंधात संयुक्त निवेदन काढले. या निवेदनात सदर क्षेत्रातील अमेरिकन लष्करीकरणाचा दोघांनीही एकमुखाने निषेध केला. चीन व रशियाच्या सीमारेषा उत्तर कोरियास लागून आहेत आणि उत्तर कोरियाशी दोन्ही राष्ट्रांचे मुत्सद्देगिरीवर आधारित संबंधही आहेत. युनो सुरक्षा समितीतही अलीकडच्या काळात चीन-रशियाचे विविध बाबींवर एकमत वाढले आहे. हे एकमत पाश्चात्य राष्ट्रांच्या विरोधात व उत्तर कोरियाच्या बाजूनेही जाताना दिसते. रशिया व चीन ही दोन्ही राष्ट्रे जवळ येण्याची कारणे त्यांच्या प्रभाव क्षेत्रात वाढणारी अमेरिकेची महत्त्वाकांक्षा, तिला असलेला पाश्चात्य राष्ट्रांचा पाठिंबा, युनोवर असलेले तिचे प्रभुत्व, आंतरराष्ट्रीय व्यापारावर असलेले तिचे नियंत्रण या घटकांशी निगडित आहेत. अशावेळी रशियन अध्यक्षाबरोबर होणारी अमेरिकन अध्यक्षांची बोलणी यातून होणारी फलनिष्पती ही आश्वासक वाटणेच कठीण बनले आहे.