|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्राजक्ता शहापूरकर यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

प्राजक्ता शहापूरकर यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन 

प्रतिनिधी / बेळगाव

मेजवानी क्वीन हा बहुमान मिळविणाऱया बेळगावच्या स्नुषा प्राजक्ता शहापूरकर यांच्या ‘जीएसबी खाद्य संस्कृती’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 9 रोजी सायंकाळी 5 वाजता आयएमईआर सभागृहात होणार आहे. नामवंत शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे.

प्राजक्ता शहापूरकर यांनी ई-टीव्हीवरील मेजवानी परिपूर्ण या कुकिंग शोमध्ये सहभागी होत विजेतेपद पटकाविले होते. या निमित्ताने विष्णू मनोहर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांची पाककलेची आवड व नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता पाहून विष्णू मनोहर यांनी त्यांना प्रोत्साहन दिल्याने आज अनेक ठिकाणी त्या परीक्षक म्हणून जात आहेत.

विष्णू मनोहर हे गेल्या 27 वर्षांहून अधिककाळ खाद्य व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी 3 हजारहून अधिक लाईव्ह कुकरी शो केले आहेत. या माध्यमातून त्यांनी सहा लाखहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार व नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शो केले आहेत. त्यांनी केलेल्या पाच फूट रुंद आणि पाच फूट लांब तसेच 45 किलो वजनाच्या पराठय़ाची लिम्का रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अलिकडेच सलग 53    तास 750 शाकाहारी पाककृती करून त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम केला आहे. मेजवानी परिपूर्ण किचनच्या 3 हजार कार्यक्रमांद्वारे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचले आहेत. त्यांच्या कार्याची व अनुभवाची दखल घेऊन केंद्र शासनानेही त्यांची भारतीय खाद्य निगमच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. भारतीय 64 कला प्रकारात पाककलासुद्धा आहे. परंतु तिचा जास्त प्रसार झाला नाही. तो व्हायला हवा, यासाठी विष्णू मनोहर प्रयत्नशील आहेत.