|Monday, June 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » गर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा

गर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा 

जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते. भयकथा ऐकताना आजवर अनेक वेळा आपण हॉस्टेलमधील एखादी गूढ भय कथा ऐकतोच. जे स्वत: हॉस्टेलमध्ये राहतात किंवा ज्यांनी हॉस्टेलमधील जीवन अनुभवलंय त्यांना असे किस्से चांगलेच माहीत असतात. अशाच अनाकलनीय भयाची चाहूल सोबत घेऊन गर्ल्स हॉस्टेल… कोणीतरी आहे तिथे ही नवीन मालिका, 10 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी युवावर सुरू होत आहे.

गर्ल्स हॉस्टेल ही मालिका महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा छोटय़ा शहरांतून, मुंबईसारख्या मोठय़ा शहरामध्ये, स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी  आलेल्या 9 मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका भयावह घटनेची गोष्ट आहे. एक अशी घटना ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच हादरून जाते. दिवसरात्र जागणारं आणि गर्दीनं ओसंडून वाहणारं मुंबई शहर, महिलांसाठी अजूनही म्हणावं तसं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी  सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा आणि वनिता  या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा आणि इतर वेगवेगळय़ा शहरांतून  आलेल्या मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून धमाल मस्ती आणि लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत आहेत. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असतानाच होस्टेलच्या भिंतीच्या आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटते. त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेलच्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडते. ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा थरकाप उडवणारे भय घेते. गूढ घटनांची साखळी वाढू लागते आणि त्यानंतर सुरू होतं एक अनाकलनीय प्रसंगांचं भयंकर चक्र… या सर्व मुली एक एक करून  या चक्रात गुरफटल्या जातात. प्रत्येकवेळी कोणीतरी आहे तिथे ही भावना बळावू लागून हॉस्टेलमध्ये एक भीतीचे सावट पसरू लागते. झी युवा आणि झी टॉकीजचे बिझिनेस हेड निखिल साने या मालिकेनिमित्त बोलताना म्हणाले, भय, गूढ, थरार आणि साहसाचे, मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत असते. ही उत्कंठा आणि रहस्ये काही कथा-कादंबऱया त्याचप्रमाणे अनेक सिनमे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अशा कथा अनुभवताना पुढे काय? हा प्रश्न आपल्याला मनात सतावत असतो हाच अनुभव झी युवाची नवीन मालिका गर्ल्स हॉस्टेल… कोणीतरी आहे तिथे देणार आहे.

या मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांचे छोटय़ा पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यकिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे, तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. सोमिल क्रिएशनची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.