|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अक्रोधाचा उपदेश

अक्रोधाचा उपदेश 

त्देवयानीचे म्हणणे ऐकून शुक्राचार्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. तेव्हा व्यथित अंत:करणाने शुक्राचार्य देवयानीला म्हणाले-देवयानी, स्तुति, याचना व प्रतिग्रह करणाऱयाची तू मुलगी नसून, जो इतरांची कधीही स्तुती करीत नाही, इतकेच नव्हे; तर इतरच ज्याची स्तुति करतात अशाची तू मुलगी आहेस.

स्वतः अत्यंत दुखावले गेले असले तरी आततायीपणाचा विचार न करता शुक्राचार्य समजावणीच्या स्वरात आपल्या लाडक्मया लेकीला पुढे म्हणाले-देवयानी, दुसऱयाने केलेली निंदा जो कोणी नेहमी सहन करतो, त्याने हे सर्व जिंकले असे तू समज. नुसते रज्जु (दोरे) हातात धरून न बसता बिथरलेल्या घोडय़ांना आवरून धरणाऱयालाच जसे सारथी म्हणतात, तसे उत्पन्न झालेल्या क्रोधाला क्षमेच्या योगाने जो आवरून धरतो त्यालाच ज्ञानी, निग्रही म्हणतात व त्यानेंच हें सर्व जिंकले! ज्याप्रमाणे शरीरावर उत्पन्न झालेली कात युक्तीनें साप टाकून देतो, त्याप्रमाणे मनावर उत्पन्न झालेला क्रोध क्षमेच्या योगाने जो टाकून देतो त्यालाच या जगात सुज्ञ असे म्हणतात. तात्पर्य, जो दुसऱयाने केलेली मर्मभेदक भाषणें सहन करून क्रोधाचे आकलन करतो व अतिशय त्रास झाला तरी जो रागास चढत नाही, तोच खरा पुरुषार्थाला प्राप्त आहे. आळस न करता महिन्याच्या महिन्यास याप्रमाणे शेकडो वर्षे पितृयज्ञ करणारा आणि कोणावर कधीही न रागावणारा या दोघांमध्ये अक्रोधी म्हणजे न रागावणारा याचीच योग्यता जास्त आहे. लहान मुलांमुलींना बऱया वाईटाचा विचार नसतो, म्हणून ती अज्ञान मुलें जे तंटे, भांडणे करतात, त्यांचे अनुकरण शहाण्याने करू नये. अर्थात अज्ञानामुळे शर्मि÷sने जो अपराध केला, त्याची क्षमा करणेंच योग्य आहे!

धर्मज्ञ, ज्ञानी, तपस्वी शुक्राचार्यांनी येथे आपल्या लाडक्मया मुलीला म्हणजेच देवयानीला जो मार्मिक आणि महत्त्वाचा उपदेश केला आहे तो आपल्यालाही चिंतन करायला लावतो. शुक्राचार्य येथे क्रोधाचा निषेध करून क्षमेचे महत्त्व प्रतिपादन करतात. संतांनीही हा विचार वारंवार सांगितला आहे. आपल्या सुप्रसिद्ध ताटीच्या अभंगांत मुक्ताई वारंवार सांगते –

योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।। विश्व रागे जाले वन्ही । संतमुखे व्हावे पाणी ।। चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।। संतांनी नुसता हा उपदेश केला नाही, तर त्यांचा आचारही तसाच होता. ज्ञानदेवादी भावंडांचा काय कमी अपमान झाला? त्यांचा काय कमी छळ झाला? पण संपूर्ण ज्ञानेश्वरीत या साऱया बद्दल कुठेही रागावणे नाही, कुठेही उद्विग्नता नाही. उलट ज्ञानेश्वर माउली एव्हढा मोठा ग्रंथ लिहून शेवटी पसायदान मागतात, त्यात स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. काय मागतात पहा – जे खळांची व्यंकटी सांडो ।

दुष्ट माणसाच्या मनाचा वाकडेपणा नाहीसा होऊ दे! काय विलक्षण मागणे आहे माउलींचे! याला म्हणतात अक्रोध. याला म्हणतात क्षमा. शुक्राचार्य यालाच पुरुषार्थ म्हणजेच खरा पराक्रम असे म्हणतात.