|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सेना बडवणार आज जिल्हा बँकेसमोर ढोल

सेना बडवणार आज जिल्हा बँकेसमोर ढोल 

प्रतिनिधी/ सातारा

भाजपा सरकारकडून शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिह्यातील किती शेतकऱयांना या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिला आहे. त्यामध्ये कोण कोण शेतकरी आहेत, याची माहिती सर्वसामान्यांना मिळालीच पाहिजे, यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना बँकेच्यासमोर ढोल वाजवणारच आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिली. दरम्यान, जिह्यात विकासकामांमध्ये निधीसाठी पाठपुरावा पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून करु, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेवेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे, सातारा शहर प्रमुख निमिष शहा, बाळासाहेब शिंदे, मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा धुरपा मुकणे, नगरसेविका नीलम जवळ, उपतालुका प्रमुख आकाश जाधव, संतोष सोळस्कर, विजय पाटील, शिवाजीराव पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, भाजपा सरकाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्या कर्जमाफीमध्ये सातारा जिह्यातील किती शेतकरी बसले आहेत. याची सर्वसामान्यांना यादी मिळाली पाहिजे. जेणेकरुन या यादीमध्ये कोणी धनदांडगे नसावेत. या मागणीसाठी आम्ही जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून यादी मागणार आहोत. यासाठी सातारा जिह्यातील हजारो शिवसैनिक सहभागी होणार आहेत, असे सांगत, मला पक्षाने संधी दिली आहे.

जिह्यात अनेक कामे करण्यासारखी आहेत. त्यामध्ये गोरगरिबांच्यावर अन्याय होत असेल तेथे शिवसेना सदैव मदतीसाठी जाणार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली अफझल खानाच्या कबरीलगतचे अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. ती थांबवण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु राहणार आहे. जिह्यात अवैध धंदे वाढले, खासगी सावकारी वाढली असून ती कमी करण्यासाठी पोलीस प्राशसनाकडे सातत्याने मागणी करण्यात येणार आहे. सातारा जिह्यात उद्योग वाढण्यासाठीही नवीन उद्योजकांच्या पाठीशी राहणार आहे, लवकरच जिल्हा दौरा काढत असून शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजून घेण्यात येणार आहे. शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेना वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हरिदास जगदाळे यांनीही गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक असा शिवसेनेचा अजेंडा होता तोही आणखी नियोजनबद्ध आखून शिवसेनेची भक्कम फळीच गावागावात उभी करण्यात येईल. शिवसेना वाढीसाठी जोमाने काम करु. नव्या जुन्या पदाधिकाऱयांची सांगड घालून शिवसेना जिह्यात कशी रुजेल हे आमच्याकडून काम होईल. तर बाळासाहेब शिंदे यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून सातारा पालिकेत जे जे चुकीचे असेल त्या विरोधात निश्चितपणे आवाज उठवून प्रशासनाला ताळयावर आणण्यासाठी सेना स्टाईलचा अवलंब केला जाईल, असा इशारा दिला.

 

Related posts: