|Monday, July 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » खरा धार्मिक आचार

खरा धार्मिक आचार 

क्रोधावर मात करण्यासाठी न रागावता त्याचे अवलोकन व आकलन करणे महत्त्वाचे आहे, असे शुक्राचार्य सांगतात. यातील मर्म लक्षात घ्यायला हवे. शत्रूच्या कोणत्याही सापळय़ातून सुटायचे असेल तर त्याच्या आहारी न जाता त्याचे अवलोकन व आकलन फार महत्त्वाचे ठरते. हा क्रोध आपला घात करायला आला आहे, तेव्हा हा कोणता वेश पांघरून आला आहे हे पाहूया असा आपण शांतपणे विचार करू लागलो तर क्रोधाचा बाह्य वेश आपोआप गळून पडेल. आपल्याला कोणी अपमान करणारे बोलते त्यावेळी आपली प्रतिक्रिया कशी असावी? मुक्ताई फार सुंदर सांगते –

शब्द शस्त्रे जाले क्लेश ।

 संती मानावा उपदेश ।।

शब्दांच्या शस्त्रांनी आपले मन जखमी होते, दुखावते. म्हणून क्रोधाचे शस्त्र हाती घ्यावे काय? यातून मूळ जखम तर बरी होणारच नाही, उलट एकाच्या क्रोधाचे उत्तर दुसऱयाने क्रोधानेच दिल्याने क्रोधाचीच बेरीज होईल. दोन ऋण संख्यांची बेरीज नेहमी ऋणच येते, हा गणितातला नियम इथेही तंतोतंत लागू होतो. ऋण संख्येत घन संख्या मिळविल्यासच उत्तर शून्य किंवा घन येऊ शकेल. क्रोध ही ऋण संख्या मानल्यास, क्षमा ही घन संख्या मानावी. क्रोधाने केलेल्या जखमेवर क्षमेचे मलम लावावे म्हणजे जखम लवकर बरी होईल. यालाच सुज्ञपणा म्हणतात असे शुक्राचार्य सांगतात.

शुक्राचार्यांनी इथे आणखी एक महत्त्वाचा विचार  सांगितला आहे. कोणत्याही धार्मिक कर्मकांडापेक्षा प्रत्यक्ष धार्मिक आचार जास्त श्रे÷ आहे, हा तो विचार होय. धार्मिक आचार म्हणजे निव्वळ कर्मकांड नव्हे. धार्मिक आचार म्हणजे नीतीचा आचार. धार्मिक आचार म्हणजे दया, क्षमा, शांति यांचा आचार. धर्माचा आचार म्हणजे आपल्या मनातील काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे विकार नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आचार. आपण स्वतःच स्वतःला तपासून पहावे. सकाळी उठून आपण स्नान करून देवपूजा केली आणि दुकानात येऊन गिऱहाईकाला टोपी घातली तर देवपूजा हे निव्वळ कर्मकांड झाले, तो धार्मिक आचार नव्हे. दररोज अठरा माळा जप करणारा अधिकारी लाच खात असेल तर त्या जप करण्याला काय अर्थ उरला? आपण किती वर्षे पंढरीची वारी केली हे सांगताना आपण या साधनेत काम, क्रोधादी कोणत्या विकारांवर विजय मिळवण्याचा कोणता प्रयत्न केला याचाही थोडा विचार नको का करायला? मी खूप चिडखोर होतो, पण पंढरीच्या वारीत संतसंगतीत नामस्मरण करता करता माझा राग हळूहळू कुठे पळून गेला हे कळलेच नाही, असे कोणी सांगत असेल तर त्याला खरी वारी कळली आणि घडली. वारीत भजन गात असताना आपला अभिमान जागृत होतो की गळून पडतो हे तपासून पाहू. संतांच्या अभंगाच्या भावार्थाकडे आपण लक्ष देत अभंग म्हटले तर आपला अहंकार आपोआप गळून पडेल आणि मग आपल्याला खरी वारी घडेल.

– ऍड. देवदत्त परुळेकर