|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जमिनीच्या वादातून यादवनगरात तलवारहल्ला

जमिनीच्या वादातून यादवनगरात तलवारहल्ला 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

यादवनगरातील डवरी वसाहतीत जागेच्या वादातून रविवारी सकाळी झालेल्या तलवारहल्ल्यात आदिनाथ महादेव शिंदे, त्यांची मुले राजू शिंदे, विकास शिंदे जखमी झाले. या तिघांनाही उपचारार्थ सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, या तलवारहल्ला प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने दोन्ही गटांच्या 18 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

यादवनगर येथे डवरी वसाहतीत आदिनाथ महादेव शिंदे (वय 60) राहतात. त्यांच्या घराशेजारी रिकामी जागा आहे. 1998 पासून या जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे. ही जागा शिंदे यांची असल्याचा निकाल न्यायालयात चारवेळा दिलेला आहे. तरीही विरोधी थोरात कुटुंब याला विरोध करत आहे. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आदिनाथ शिंदे हे मुले राजू आदिनाथ शिंदे (वय 26) आणि  विकास आदिनाश शिंदे (वय 35) यांना घेऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले.

रिकाम्या जागेचा ताबा घेत असताना त्याला काशिनाथ थोरात, शरद थोरात, कुमार थोरात यांनी विरोध केला. काशिनाथ थोरात, शरद थोरात यांनी आदिनाथ शिंदे, राजू शिंदे, विकास शिंदे यांना काठय़ांनी मारहाण केली. तर कुमार थोरात हा घरातून तलवार घेऊन आला. त्याने तलवारीने आदिनाथ शिंदे, राजू शिंदे आणि विकास शिंदे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हे तिघेही जखमी झाले. शिंदे आणि थोरात यांच्यात वाद सुरू असताना घटनास्थळी तातडीने राजारामपुरी पोलीस आले. पोलिसांना पाहताच काशिनाथ थोरात, शरद थोरात, कुमार थोरात हे तेथून पळून गेले. दरम्यान तलवारहल्ल्यात जखमी झालेल्या शिंदे कुटुंबातील तिघांना अकरा वाजण्याच्या सुमारास उपचारार्थ सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याची नोंद सायंकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

या तलवारहल्ला प्रकरणी आदिनाश महादेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुमार काशिनाथ थोरात (वय 35), काशिनाथ रामचंद्र थोरात (वय 65), रंजना काशिनाथ थोरात (वय 58), तुळशीदास काशिनाथ थोरात (वय 43), शरद काशिनाथ थोरात (वय 39) या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात तुळशीदास काशिनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश आदिनाश शिंदे, सुभाष आदिनाथ शिंदे, आदिनाथ महादेव शिंदे, सतीश विश्वनाथ शिंदे, चौरंगनाथ महादेव शिंदे, राजू आदिनाथ शिंदे, विलास आदिनाथ शिंदे, देवेंद्र आदिनाथ शिंदे, रणजित आदिनाथ शिंदे, उमेश चौरंगनाथ शिंदे, गणेश चौरंगनाथ शिंदे आणि उत्तम माळी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दिवाणी दाव्यातील वादग्रस्त जागेचा ताबा घेण्यावरून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Related posts: