|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » आता पाच दिवसांत काढा भविष्यनिर्वाह निधी

आता पाच दिवसांत काढा भविष्यनिर्वाह निधी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भविष्यनिर्वाह निधी काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास आता ही रक्कम पाच दिवसात बँक खात्यात जमा होईल. मात्र यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेकडे आधार क्रमांक नोंद करणे आणि यूएएन असणे अत्यावश्यक आहे. सदस्यांच्या खात्याबरोबर आधार क्रमांक जोडलेला असल्यास पाच दिवसात रक्कम जमा करण्याचे आदेश संघटनेच्या आयुक्तांनी दिलेत.

आधार क्रमांक सदस्यांनी खात्याबरोबर जोडावा यासाठी ऑनलाईन दाव्याला प्राधान्य देण्यात यावे. सर्व कार्यालयांना सदस्यांचा निधी पाच दिवसांत हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदस्यांनी आपल्या खात्याबरोबर आधार क्रमांक जोडत नव्या सेवेचा लाभ घ्यावा असे आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी म्हटले. सध्या संघटनेचे 4 कोटीपेक्षा अधिक सक्रीय सदस्य आहेत. ऑनलाईन दावा करण्याच्या सेवा फायदा त्याच लोकांना घेता येईल, ज्यांनी युनिफाईड पोर्टलवर ई केवायसी पूर्ण केली आहे. म्हणजेच त्यांना यूएएन, आधार आणि बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. यानंतर युनिफाईड पोर्टलवर ऑनलाईन दावा करता येईल.

आता पीएफमधील पैसे काढण्यासाठी कंपनीकडे अर्ज करण्याची गरज भासणार नाही. यासाठी ईपीएफओची वेबसाईट www. epfoindia.com/site_en  वर ऑनलाईन दाव्याचा पर्याय दाखविण्यात येईल. ऑनलाईन दावा पर्यायावर क्लिक करण्यात आल्यानंतर www.unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर यूएएन आणि पासवर्ड टाईप करताच दावा सबमिट करता येईल.