|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » विजयाच्या ट्रकवर परतण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील

विजयाच्या ट्रकवर परतण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील 

वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल

सलग 4 विजयांची मालिका मागील लढतीत खंडित झाल्यानंतर मिथाली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (दि. 12) बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी फेरीसाठी मैदानात उतरेल. योगायोगाने या दोन्ही संघांची सलग 4 विजयाची मालिका मागील सामन्यात खंडित झाली असून येथे विजयाच्या ट्रकवर परतणे, हा त्यांचा प्राधान्यक्रम असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.

आयसीसी विश्वचषकाच्या या हंगामात भारताने यजमान इंग्लंडसह, वेस्ट इंडीज, पाकिस्तान व श्रीलंका यांच्याविरुद्ध धमाकेदार विजय संपादन केले. मात्र, दक्षिण आफ्रिकेने भारताची ही वाटचाल मागील सामन्यात खंडित केली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची सलग 4 विजयांची मालिका मागील लढतीत इंग्लंडने खंडित केली होती.

सध्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकही संघ अद्याप उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. मात्र, सरस धावगतीच्या आघाडीवर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा मजबूत स्थितीत आहे. एकीकडे, ऑस्ट्रेलियाला मागील लढतीत केवळ 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला तर दुसरीकडे, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठय़ा फरकाने अपयशाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे.

वास्तविक, यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागील लढतीत विजय संपादन करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताकडे नामी संधी होती. मात्र, त्यात अपयश आल्यानंतर शेवटच्या दोन साखळी लढती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड अशा मातब्बर संघाविरुद्ध असल्याने भारतीय महिलांसमोर अर्थातच आव्हानात्मक परिस्थिती असेल. या हंगामात भारतीय फलंदाजी विशेष बहरात राहिली. मात्र, मागील लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 274 धावांचा पाठलाग करताना हाच संघ अवघ्या 158 धावांमध्ये गारद झाला, ही चिंतेची बाब ठरली. त्यावेळी भारतीय संघ 17 षटकाच्या दरम्यान 6 बाद 56 अशा बिकट अवस्थेत होता, त्याचवेळी निकाल जवळपास स्पष्ट झाला होता. मात्र, त्यावेळी केवळ दीप्ती शर्माने 111 चेंडूत 60 धावांची खेळी साकारल्यामुळे संघाने 100 धावाच्या आत गाशा गुंडाळण्याची नामुष्की टाळली होती. त्या लढतीत झुलन गोस्वामी 43 धावांवर नाबाद राहिली होती.

तसे पाहता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाचे प्रदर्शन बऱयाच अंशी अपयशी स्वरुपाचे ठरले आहे. कारण, भारताला त्यांच्याविरुद्ध 41 पैकी 8 सामन्यातच विजय मिळवता आले आहेत. पण, उभय संघातील मागील लढतीत मिथाली राजच्या 89 धावांमुळे भारताने 5 गडी राखून विजय संपादन केला होता. यंदा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडताना बहरातील स्मृती मानधना, पूनम राऊत व हरमनप्रीत कौर यांच्यासह दीप्ती शर्मा, कर्णधार मिथाली राज यांच्याकडून भारताला विशेष अपेक्षा असतील.

संभाव्य संघ

भारत : मिथाली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुझहत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा.

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), साराह ऍले, क्रिस्टन बिम्स, ऍलेक्स ब्लॅकवेल, निकोल बोल्टन, अश्लेघ गार्डनर, रॅशेल हेन्स, ऍलिसा हिली (यष्टीरक्षक), जेस जोनासन, बेथ मुनी, एलिसी पेरी, मेगन स्कट, बेलिंदा व्हॅकारेव्हा, एलिसी व्हिलानी, अमांदा-जेड वेलिंग्टन.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून.