|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तेंडुलकर, नाईक यांचे उमेदवारी अर्ज सादर

तेंडुलकर, नाईक यांचे उमेदवारी अर्ज सादर 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपतर्फे विनय तेंडुलकर व काँग्रेसतर्फे राज्यसभेचे मावळते खासदार शांताराम नाईक यांनी काल मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. पर्वरी येथील विधानसभागृहात निर्वाचन अधिकाऱयांकडे अर्ज सुपूर्द करण्यात आले. राज्यसभेसाठी 21 जुलै रोजी मतदान होणार आहे.

आज 12 जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कुणाल यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विधानसभा सचिव एन. बी. सुभेदार यांची निर्वाचन अधिकारी व नम्रता उल्मन यांची सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 14 जुलै रोजी हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. 21 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्या. 4 या वेळेत विधानसभा गृहातील अतिमहानीय ब्लॉकमधील 15 क्रमांकाच्या खोलीत मतदान होणार आहे. विधानसभेचे सदस्य असलेले 38 मतदार या मतदानात भाग घेतील. मतदानानंतर संध्या. 5 वा. मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

तेंडुलकर यांच्यासमवेत सुदिन, विजय

भाजपचे उमेदवार विनय तेंडुलकर यांनी काल सकाळी 11.30 वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे मंत्री व आमदारांसह मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांची उपस्थिती होती. भाजपचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री विनोद पालयेकर, माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर, सभापती प्रमोद सावंत, आमदार एलिना साल्ढाणा, राजेश पाटणेकर, कार्लुस आल्मेदा, प्रवीण झांटय़े व इतरांची उपस्थिती होती.

नाईक यांच्यासमवेत चेल्लाकुमार व आमदार

शांताराम नाईक यांच्यासोबत काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार रवी नाईक, लुईझिन फालेरो, इजिदोर फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस सिल्वेरा, सुभाष शिरोडकर, दिगंबर कामत, निळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात व अन्य आमदार तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

विजयाची खात्री : तेंडुलकर

राज्यसभा निवडणुकीत आपला विजय होणार याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री आहे. विधानसभेत भाजप आघाडी सरकारकडे बहुमत आहे. त्याचबरोबर युतीतील घटक पक्षानीही आम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. गोवा फॉरवर्ड, मगो आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या अपक्ष आमदारांचाही आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचे विनय तेंडुलकर म्हणाले.

निधर्मी आणि समविचारी आमदारांना भेटणार : नाईक

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज सादर केलेल्या राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. विधानसभेतील निधर्मी आणि समविचारी आमदारांशी संपर्क साधून आपण त्यांचा पाठिंबा मागणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

राज्यसभेसाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा : सरदेसाई

राज्यसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाने आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार विनय तेंडुलकर यांना दिला आहे. या अगोदरच पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोवा फॉरवर्ड सरकार मधील घटक पक्ष असल्याने आपला पाठिंबा भाजप उमेदवाराला असेल हे निश्चित असल्याचे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. राज्यसभेच्या उमेदवारीवर गोवा फॉरवर्डने दावेदारी केली नव्हती किंवा त्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच अन्य कुणाशी चर्चा केली नव्हती, असेही ते म्हणाले.

समविचारी घटकांनी विचार करावा : कवळेकर

राज्यसभेसाठी मतदान करताना जे निधर्मी व समविचारी घटक आहेत त्यांनी विचार करण्याची गरज आहे. शांताराम नाईक हे काँग्रेसचे उमेदवार असून ते योग्य उमेदवार आहेत. त्यामुळे समविचारी आमदार त्यांना मतदान करतील असा विश्वास विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी व्यक्त केला.