|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीत

ऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीत 

आयसीसी महिला विश्वचषक : भारतावर 8 गडय़ांनी विजय

वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल

कर्णधार मेग लॅनिंग व एलिस पेरी यांची शानदार नाबाद अर्धशतके आणि तिसऱया गडय़ासाठी त्यांनी केलेल्या अभेद्य 124 धावांच्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन महिलांनी भारतीय महिलांचा 8 गडय़ांनी पराभव करून आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. 88 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावणाऱया लॅनिंगला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. भारताच्या पूनम राऊतचे शतक आणि मिथाली राजची विक्रमी कामगिरी वाया गेली.

ऑस्ट्रेलियन महिलांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली आणि त्यांनी धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडत भारताला 50 षटकांत 7 बाद 226 ंधावांवर रोखले. त्यानंतर सावध सुरुवात करीत ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 45.1 षटकांत केवळ 2 गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. बोल्टन व मुनी यांनी 62 धावांची सलामी दिल्यानंतर मुनी-लॅनिंग जोडीने 40 धावांची भर घातली. बोल्टनने 48 चेंडूत 36, मुनीने 68 चेंडूत 45 धावा केल्या. लॅनिंगला पेरीकडून चांगली साथ मिळाली आणि दोघींनी अभेद्य शतकी भागीदारी करून 45.1 षटकांत दणदणीत विजय साकार केला. पेरी 67 चेंडूत 60 धावा काढून नाबाद राहिली. लॅनिंगने 88 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार मारला.

या पराभवामुळे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्मयात आले असून शनिवारी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर भारताला विजय मिळवावाच लागणार आहे. गुणतक्त्यात इंग्लंडने 10 गुणांसह पहिले, ऑस्ट्रेलियाने 10 गुणांसह दुसरे, द.आफ्रिकेने 9 गुणांसह तिसरे, भारताने 8 गुणांसह चौथे व न्यूझीलंडने 7 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे.

पूनम राऊतचे दुसरे वनडे शतक

तत्पूर्वी, सलामीवीर पूनम राऊतचे संघर्षपूर्ण शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या विक्रमी 69 धावांच्या बळावर भारतीय महिला संघाने निर्धारित षटकात 7 बाद 226 धावांपर्यंत मजल मारली. आयसीसी विश्वचषकातील भारताची ही सहावी साखळी लढत होती. राऊत व मिथाली यांनी दुसऱया गडय़ासाठी 157 धावांची भागीदारी केली. पण, यासाठी त्यांनी 37 पेक्षा अधिक षटके घेतल्याने भारताला त्याचा बऱयाच अंशी फटका बसला.

मिथाली राजने माजी इंग्लिश कर्णधार चार्लोट एडवर्ड्सचा वनडे क्रिकेटमधील 5992 धावांचा सर्वोच्च विक्रम मोडीत काढला, ते या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. आपले 49 वे अर्धशतक साजरे करताना तिने वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा माईलस्टोनही सर केला होता. फिरकी गोलंदाजांविरुद्ध विशेष आक्रमकपणाने खेळणाऱया पूनमने आपल्या खेळीत 11 चौकार फटकावले. तिच्या फटकेबाजीचा ऑफस्पिनर ऍश्ले गार्डनर (10 षटकात 1/48) व लेगस्पिनर कर्स्टन बीम्स (9 षटकात 0/43) यांना फटका बसला.

मिथालीच्या खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश असला तरी तिच्या एकंदरीत संथ खेळीचा धावगतीवर विपरीत परिणाम झाला. विशेषतः तिला स्ट्राईक रोटेट करता आला नाही. तसेच एकेरी-दुहेरी धावाही जमवता आल्या नाहीत. 6 हजार धावांचा माईलस्टोन गाठताना षटकार खेचला, हाच तिच्यासाठी एकमेव आत्मविश्वासपूर्ण फटका ठरला. मिथाली बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने (22 चेंडूत 23) जलद फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र, स्लॉग ओव्हर्समध्ये तरीही भारताला अपेक्षित धावा जमवता आल्या नाहीत.

बॉक्स

मिथाली राज 6 हजार धावा जमवणारी पहिली महिला फलंदाज

भारतीय कर्णधार मिथाली राजने हिने या लढतीदरम्यान महिला वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावा जमवणारी पहिली महिला फलंदाज ठरण्याचा मान प्राप्त केला. यामुळे, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी व सर्वाधिक धावा असे दोन्ही विक्रम भारताच्या खात्यावर नोंदवले गेले. सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी सध्या आघाडीवर आहे.

मिथालीने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावांवर पोहोचताना माजी इंग्लिश कर्णधार चार्लोट एडवर्ड्सचा 5992 धावांचा विक्रम मागे टाकला. एलिसी पेरीचा चेंडू कव्हरच्या दिशेने एकेरी धावेसाठी फटकावत तिने विश्वविक्रमावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. पुढे, लेगब्रेक गोलंदाज कर्स्टन बीम्सला उत्तूंग षटकार खेचत मिथालीने 6 हजार धावांचा माईलस्टोन सर केला आणि उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून तिला मानवंदना दिली. नंतर ती 114 चेंडूत 69 धावांवर बाद झाली. सध्या तिच्या खात्यावर 183 सामन्यात 6028 धावा आहेत.

मिथालीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सध्या 15 वे वर्ष सुरु असून महिला क्रिकेटमध्ये तिचे योगदान विशेष प्रेरणादायी ठरले आहे. मिथाली लवकरच 35 व्या वर्षात पदार्पण करणार असून 2003 विश्वचषकापूर्वी भारतातर्फे पदार्पण करणारी व सध्याच्या संघातही असणारी ती झुलन गोस्वामीसह केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध महिलांच्या कसोटी लढतीत टाँटन इथे 214 धावांची खेळी साकारली, त्याचवेळी मिथालीची फलंदाजीतील हुकूमत दिसून आली होती. आताही कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातर्फे हाच सर्वोच्च धावांचा विक्रम आहे.

धावफलक

भारतीय महिला : पूनम राऊत झे. बोल्टन, गो. पेरी 106 (136 चेंडूत 11 चौकार), स्मृती मानधना झे. हिली, गो. गार्डनर 3 (10 चेंडू), मिथाली राज झे. व गो. बीन्स 69 (114 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), हरमनप्रीत कौर यष्टीचीत हिली, गो. स्कट 23 (22 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वेदा कृष्णमूर्ती धावचीत (स्कट-हिली) 0 (0 चेंडू), सुषमा वर्मा त्रि. गो. स्कट 6 (8 चेंडू), झुलन गोस्वामी त्रि. गो. पेरी 2 (3 चेंडू), शिखा पांडे नाबाद 7 (5 चेंडूत 1 चौकार), दीप्ती शर्मा नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 5. एकूण 50 षटकात 7 बाद 226.

गडी बाद होण्याचा क्रम

1-9 (मानधना, 3.2 षटके), 2-166 (मिथाली राज, 40.3 षटके), 3-203 (राऊत, 46.2), 4-204 (कृष्णमूर्ती, 46.3), 5-208 (कौर, 47.3), 6-211 (गोस्वामी, 48.1), 7-220 (सुषमा वर्मा, 49.3).

गोलंदाजी

स्कट 10-0-52-0, गार्डनर 10-1-48-1, जोनास्सन 10-1-38-0, एलिसी पेरी 10-0-37-2, बीम्स 9-0-43-1, व्हिल्लानी 1-0-8-0.

ऑस्ट्रेलियन महिला : बोल्टन झे. वर्मा गो. पूनम यादव 36 (48 चेंडूत 6 चौकार), बी. मुनी धावचीत शर्मा 45 (68 चेंडूत 5 चौकार), लॅनिंग नाबाद 76 (88 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), पेरी नाबाद 60 (67 चेंडूत 8 चौकार), अवांतर 10, एकूण 45.1 षटकांत 2 बाद 227.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-62, 2-103.

गोलंदाजी

झुलन गोस्वामी 5.1-1-27-0, दीप्ती शर्मा 10-2-44-2, शिखा पांडे 6-1-16-0, हरमनप्रीत कौर 6-0-38-0, एकता बिश्त 10-1-55-0, पूनम यादव 8-0-46-0.