|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस

गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस 

प्रतिनिधी, मुंबई

जूनच्या शेवटच्या पंधरवडय़ात धुव्वाधार बरसलेल्या पावसाने जुलैपासून दडी मारली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत निम्मा पाऊस झाला आहे. 2016 मध्ये  सरासरीच्या 421.1 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. जून 2017 च्या अखेरीस पावसाचे प्रमाण 218.5 मिलीमीटर इतके आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून येत्या तीन-चार दिवसात पाऊस पडला नाही तर 12 टक्के क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे.

राज्यात पावसाचे पुनरागमन लांबले असले तरी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. नागपूर वगळता कोकण, पुणे, अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद विभागातील धरणात बऱयापैकी जलसंचय आहे. आजच्या घडीला राज्यातील छोटय़ा-मोठय़ा धरणांमध्ये मिळून 24.41 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकरी आनंदाने कामाला लागला होता. जून महिन्यात हवामान खात्याचा अंदाज  खरा ठरवणाऱया पावसाने जुलैपासून पाठ फिरवली. पाऊस गायब झाल्याने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱयांसाठी पेरण्या लांबवण्याचे आवाहन करावे लागले आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

यासंदर्भात कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना विचारले असता त्यांनी पाऊस आणखी लांबल्यास शेतकऱयांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले. येत्या तीन-चार दिवसात पाऊस पडला नाही तर 12 टक्के क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुबार पेरणीसाठी खते, बियाणे उपलब्ध करणार

शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट लक्षात घेऊन पेरणीसाठी खते, बियाणे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी कृषी खात्याने सुरू केली आहे. शेतकऱयांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे उपलब्ध करून दिली जातील. खते अथवा बियाणांचा तुटवडा जाणवू देणार नाही. पावसाने ओढ दिलेल्या जिल्हय़ांत पिकांची काय स्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी आपण स्वत: एक-दोन जिल्हय़ांना भेट देणार असल्याचेही फुंडकर यांनी सांगितले.

धरणातील उपयुक्त पाणीसाठा

विभाग         गेल्यावर्षीचा पाणीसाठा           आजचा पाणीसाठा

कोकण            47.81 टक्के                        63.51 टक्के

पुणे                24.97 टक्के                        26.41 टक्के

नाशिक              19.98 टक्के                    23.10 टक्के

अमरावती           17.53 टक्के                  17.05 टक्के

नागपूर             19.50 टक्के                    10.92 टक्के

Related posts: