|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सांगलीतील पिता-पुत्रासह पाचजण ताब्यात

सांगलीतील पिता-पुत्रासह पाचजण ताब्यात 

प्रतिनिधी /निपाणी :

येथील आडी मल्लय्या डोंगरानजीक हणबरवाडी रोडवर पोलीसपुत्र शाहरुख बोजगर याचा खून झाल्याची घटना बुधवार 12 रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांकडून गती देण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली येथील पिता-पुत्रासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास सांगली व कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने निपाणी पोलीस करत आहेत.

बीएस्सी झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा शाहरुख हा भारती विद्यापीठात एमएस्सी करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी आवश्यक असलेला स्थलांतर दाखला आणण्यासाठी तो मंगळवारी सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठात जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला होता. तत्पूर्वी एक तासआधी पोलीस हवालदार असलेले त्याचे वडील शब्बीर बोजगर हे डय़ुटीवर निघून गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शाहरुख न आल्याने आई-वडील तसेच अन्य नातेवाईकांनी सर्वत्र फोनाफोनी तसेच शोधाशोध केली. मात्र शाहरुखचा शोध लागला नाही. यातच बुधवार 12 रोजी सकाळी 7 वाजता शाहरुखचा मृतदेह आडी मलय्यानजीकच्या हणबरवाडी रोडवर आढळून आला. अमानुषपणे झालेल्या या खुनाने परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, मंगळवारी दुपारी 12.15 नंतर बंद झालेले त्याचे दोन्ही मोबाईल त्याच्या खुनानंतरही सापडले नाहीत. मंगळवारी दुपारी 12.15 च्या सुमारास शाहरुखच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे सरनोबतवाडी परिसरात दाखविण्यात आल्याने गुरुवारी पोलिसांनी या भागात तपास मोहीम राबवली. त्यामध्ये सरनोबतवाडी व शिवाजी विद्यापीठ परिसर तसेच टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज मागवून त्याची पाहणी करण्यात आल्याचे समजते. मंगळवारी दुपारी बंद झालेला मोबाईल व मध्यरात्री झालेला खून यावरून आधी शाहरुखचे अपहरण झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता.

प्रेमप्रकरणाशी खुनाचा संबंध?

शाहरुखचे एका विवाहितेशी प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते. यावरून वाद उद्भवल्यानंतर शाहरुखच्या सांगलीतील नातेवाईकांनी हे प्रकरण मिटवले होते. मात्र याची शाहरुखच्या आई-वडिलांना कल्पना नव्हती. यादरम्यान चार महिन्यांपूर्वी सदर विवाहितेने आत्महत्या केली होती. या आत्महत्येशी शाहरुखच्या खुनाचा संबंध असावा या संशयाने पोलिसांनी तपास सुरू केला होता.

Related posts: