|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रस्ते कामातील टक्केवारीची लाचलुचपतकडून चौकशी सुरू

रस्ते कामातील टक्केवारीची लाचलुचपतकडून चौकशी सुरू 

प्रतिनिधी /सांगली :

महानगर पालिका क्षेत्रातील 24 कोटीच्या रस्ते कामातील टक्केवारी प्रकरणाची चौकशी लाचलुचपत विभागाने सुरू केली असून गुरूवारी बांधकाम, नगररचना विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱयांकडून माहिती घेतली.

मनपा क्षेत्रातील 24 कोटीचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. यातील बहुतांशी रस्त्यांची कामे अद्याप सुरू नसली तरी या कामात संबंधित ठेकेदारांकडून टक्केवारी वसूल केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही टक्केवारी पदाधिकारी, अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मनपा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनाही टक्केवारी दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आयुक्त खेबुडकर यांनी टक्केवारीचा आरोप फेटाळत याच्या चौकशीसाठी लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्याचा इशारा गेल्या आठवडय़ापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार दोनच दिवसापूर्वी आयुक्तांनी तशी तक्रार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांना दिली असून या तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱयांनी चौकशी सुरू केली आहे.

 गुरूवारी दुपारी लाचलुचपतच्या अधिकाऱयांचे शिष्टमंडळ मनपाच्या बांधकाम व नगरचना विभागात गेले तेथे त्यांनी या विभागाच्या प्रमुखांसह कर्मचाऱयांशी याबाबत चर्चा करून या कामांची माहिती घेतली तसेच चौकशी कामी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. याशिवाय या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांचीही चौकशी सुरू केली. सुमारे तासभर चौकशी सुरू होती. या प्रकरणी झालेल्या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी मोबाईल कॉलही तपासले जाणार आहेत. तसेच संबंधितांचे बँक खातीही तपासली जाण्याची शक्यता आहे.