|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘स्मार्ट ग्राम’चा 90 लाखांचा निधी पडून

‘स्मार्ट ग्राम’चा 90 लाखांचा निधी पडून 

9 ग्रा. पं. ना मिळणार प्रत्येकी 10 लाख,

खर्चाचे निर्देशच नसल्याने निधी जि.प. कडेच

जूनमध्ये मिळाला जिल्हय़ाला निधी

दीपक कुवळेकर /देवरुख

जिल्हय़ातील 9 गावांची ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत निवड झाली आहे. या गावांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. गेले काही महिने हा निधी थकित होता. मात्र जून महिन्यात हा निधी जि. प. कडे वर्ग करण्यात आला. परंतू हा निधी कोणत्या कामासाठी वापरायचा याबाबत निर्देश नसल्याने निधी तसाच पडून राहिला आहे.

जिल्हय़ातील नऊ गावांचा स्मार्ट ग्राम म्हणून विकास करण्यात येणार आहे. शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्हय़ातील 9 तालुक्यातून प्रत्येकी एक अशा 9 गावांची तालुकास्तरीय समितीने निवड केली आहे. या निवड झालेल्या गावाचा महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला होता. ही योजना एप्रिलपासून सुरु करण्यात आली होती.

राज्यातील गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनाचा वापर करुन पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृध्द ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. या पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करुन शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली.

या योजनेसाठी गावाची निवड करताना 5 हजार लोकसंख्येपेक्षा मोठय़ा ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱया ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनूसार गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्त्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर असे गुणांकन करण्यात आले.

जिल्हय़ातील 500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेतला होता. या ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय समितीने पाहणी करुन गुणांकन केले होते. गुणांकनात सर्वात जास्त गुण असलेल्या 25 टक्के ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. त्यातून 9 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पुर्ण झाली होती. यामुळे तात्काळ निधी मिळेल, अशी अपेक्षा असताना निधी मिळण्यास जून महिना उजाडला. एकुण 90 लाख रुपयाचा निधी जि. प. ला प्राप्त झाला आहे. त्याच बरोबर जिल्हास्तरीय निवड झालेल्या ग्रामपंचायतीला 40 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे. हा निधि मात्र अजून वर्ग झालेला नाही. जिल्हास्तरीयसाठी लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 लाखाचा निधी मिळाला असला तरी तो कसा खर्च करायचा याचे निर्देश शासनाने न दिल्याने तो जि. प. च्या खात्यातच पडून राहिला आहे. हा निधी कसा खर्च करावा यासाठी जि. प. ने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. हे आल्यानंतरच हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

निधी मिळणाऱया स्मार्ट ग्रामपंचायती- भिंगोर्ली (मंडणगड), जालगांव (दापोली), साखर (खेड), कोलकेवाडी (चिपळुण), हेदवी (गुहागर), आरवली (संगमेश्वर), नाणीज (रत्नागिरी), वेरळ (लांजा), धोपेश्वर (राजापूर) यांचा समावेश आहे.

Related posts: