|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तोडफोडीच्या प्रकारांसंदर्भात सतर्क राहावे

तोडफोडीच्या प्रकारांसंदर्भात सतर्क राहावे 

प्रतिनिधी/ काणकोण

गोव्याच्या विविध भागांमध्ये सध्या धार्मिक स्थळी तोडफोड करण्याचे प्रकार चालू असून गोव्याचा धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक यातून करत आहेत. त्यासंबंधी सतर्क राहावे, असे निवेदन काणकोणच्या जागरूक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांना सादर केले आहे.

काणकोणच्या आरोग्य कल्याण संघटनेचे अध्यक्ष डायगो डिसिल्वा, नातिविदाद डिसा, अनिल भगत, होनेरात फर्नांडिस, दित्रोज बार्रेटो यांच्यासहित विविध भागांतून आलेल्या 25 पेक्षा अधिक महिला आणि पुरुष यावेळी उपस्थित होते. धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱयाना अद्दल घडविण्याची गरज यावेळी बोलताना नातिविदाद डिसा यांनी व्यक्त केली. संध्याकाळी काणकोणच्या नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी चावडीवरील कदंब बसस्थानक ते मामलेदार कार्यालयपर्यंत फेरी काढण्यात आली.

पोलिसांकडून खबरदारी

दरम्यान काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी देखील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देताना गस्तीवर भर दिला आहे. उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चावडीवरील सेंट तेरेझा चर्च, भाटपाल येथील सेंट झेवियर, लोलयेतील सेंट सॅबेस्त्यांव, गालजीबाग, सादोळशे येथील अवर लेडी, चिपळे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर, आगोंद येथील सेंट ऍनीस चर्च व दफनभूमींजवळ रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत कडक पहारा ठेवण्यात येऊ लागला आहे.

त्याचबरोबर गणपती मंदिर-करमल घाट, भूमिपुरुष मंदिर-गुळे, सरस्वती मंदिर-चार रस्ता, परशुराम मंदिर, लक्ष्मीनारायण, सिद्धेश्वर मंदिर, साईबाबाची घुमटी-पैंगीण, समाज मंदिरöतामणे, निराकार मंदिर-माशे, मारूती मंदिरöदापट, दाडदेव मंदिर-पोळे, आंबेघाट वन चेकनाका, माटवेमळ येथे पंचायतीजवळ या सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी क्रॉस आणि मंदिरे, घुमटय़ा आहेत त्या प्रत्येक ठिकाणावर कडक नजर ठेवण्यात येणार असून काणकोण पोलीस स्थानकाची वाहने विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. हेड कॉन्स्टेबल, साहाय्यक उपनिरीक्षक यांना अतिरिक्त काम देण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित काणकोणच्या पोलीस स्थानकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी नाईक यांनी केले आहे.