|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उसाला अधिकाधिक दर देऊन व्यवसाय वाढीकडे लक्ष

उसाला अधिकाधिक दर देऊन व्यवसाय वाढीकडे लक्ष 

प्रतिनिधी/ बेळगाव

साखर उत्पादन उद्योग आज अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा ठरला आहे. ऊस पिकविणाऱया शेतकऱयांपासून ते अगदी मालाची वाहतूक करणाऱया हमालापर्यंत अनेकांना या उद्योगाने रोजगार दिला आहे. हा उद्योग आता तंत्रज्ञानाची कास धरून प्रगती करत आहे. शेतकऱयांना अधिकाधिक उसाचा दर देऊन हा व्यवसाय कसा वाढेल, याकडे आपली संघटना लक्ष देत असल्याचे दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग जाधव यांनी सांगितले.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) संस्थेची 63 वी वार्षिक परिषद बेळगाव येथे पार पडली. या परिषदेत मानसिंग जाधव बोलत होते. व्यासपीठावर राज्यसभा सदस्य खासदार डॉ. प्रभाकर कोरे, जिल्हाधिकारी एन. जयराम, उगार शुगर्सचे आर. व्ही. शिरगावकर, संघटनेचे उपाध्यक्ष एस. एस. गंगावती, गोदावरी रिफायनरीजचे संचालक समीर सोमय्या, मानसीभाई पटेल, कोईमत्तूtर येथील बक्षीराम, सिद्दाप्पा शुगर्सचे जगदीश गुडगुंटी, राममूर्ती सिंग, बी. डी. पवार, जगदीश कुलकर्णी उपस्थित होते.

साखर उद्योगामध्ये कर्नाटक राज्य तिसऱया क्रमांकावर

खासदार प्रभाकर कोरे म्हणाले, बेळगाव विभाग हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नद्यांमुळे येथील साखर उद्योग बहरला आहे. देशात साखर उद्योगामध्ये कर्नाटक राज्य तिसऱया क्रमांकावर आहे. हा व्यवसाय अधिकाधिक वाढावा, यासाठी सरकारदेखील प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी एन. जयराम म्हणाले, अशा प्रकारची पहिलीच परिषद बेळगावमध्ये होत असल्याने याचा येथील कारखानदारांना फायदा होणार आहे. इतर व्यवसायांप्रमाणेच या व्यवसायातही तंत्रज्ञानाची भर पडत असल्याने त्याचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा परिषदा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱया व नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन करणाऱया व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात केएलई संगीत विद्यालयाच्या ईशस्तवनाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. एस. एस. गंगावती यांनी परिचय करून दिला. जगदीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

साखर उद्योगावर आधारित स्टॉल्सचे प्रदर्शन

कार्यक्रमाच्या स्थळी साखर उद्योगावर आधारित स्टॉल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, मशीन, तसेच शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या परिषदेला कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश भागामधून प्रतिनिधी उपस्थित होते.

Related posts: