|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » समान न्याय, सर्वांगीण विकाससमान न्याय, सर्वांगीण विकास 

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची ग्वाही    रालोआच्या खासदार-आमदारांशी साधला संवाद

प्रतिनिधी / मुंबई

देशाच्या संविधानाचे सर्वोच्च महत्त्व टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय आणि सर्व राज्यांचा सर्वांगीण विकास यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमदेवार रामनाथ कोविंद यांनी शनिवारी येथे दिली.

राष्ट्रपतिपदासाठी परवा (17 जुलै) निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद यांनी आज गरवारे क्लबमध्ये रालोआचे घटक पक्ष असलेल्या भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाच्या खासदार-आमदारांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी वगळता सर्व घटक पक्षांचे नेते आवर्जुन उपस्थित होते.

देशातील युवावर्गाच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच शिक्षणाचा प्रसार आणि आधुनिकीकरण व्हावे हे आपले प्राधान्याचे विषय असतील. समाजातील वंचित घटकाला न्याय देतानाच राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही कोविंद यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोंविद यांना शुभेच्छा दिल्या.

रामनाथ कोविंद हे मोठे कर्तृत्व आणि व्यासंग असलेले शालीन व्यक्तीमत्त्व आहे. राष्ट्रपतिपदासाठी रालोआने योग्य उमेदवाराची निवड केली आहे. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक यश मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. तर संविधानाचे जाणकार असलेल्या कोंविद यांना महाराष्ट्रातून मोठे मताधिक्य मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. रालोआच्या उमेदवाराला विजयी करण्याचा शब्द उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार हे रामनाथ कोविंद यांना मतदान करतील, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी भाजपचे मध्यप्रदेशातील नेते कैलास विजयवर्गीय यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक कार्य पध्दतीविषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, शिवसेना नेते सुभाष देसाई, अनंत गीते, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी रामनाथ कोविंद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!