|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अडरेतील धरणात तरूणाचा बुडून मृत्यू

अडरेतील धरणात तरूणाचा बुडून मृत्यू 

आंघोळीसाठी गेला असताना दुर्घटना

 

वार्ताहर /अडरे

चिपळूण तालुक्यातील अडरे-अनारी येथील धरणातून कोसळणाऱया पाण्यात मौजमजा करण्यासाठी असंख्य पर्यटकांची झुंबड उडत असतानाच येथे आंघोळ करणे एका तरूणाच्या जीवावर बेतले आहे. धरणाच्या आतील भागात चिंचघरी येथील तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबत अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

गणेश कृष्णा चाळके (28, चिंचघरी) असे मृत तरूणाचे नाव आहे. गणेश हा 13 जुलै रोजी दुपारनंतर अडरे-अनारी धरणावर आंघोळीसाठी गेला होता. मात्र सायंकाळपर्यंत घरात परत न आल्याने कुटुंबियांकडून त्याची शोधाशोध सुरू झाली. यातच दुसरा दिवस उजाडला तरी तो घरी न परतल्याने भाऊ मनीष व आईने धरणावर जाऊन पाहिले असता तिथे आढळलेले कपडे गणेशचेच असल्याचे मनीषने ओळखले. त्यानुसार मनीष याने शनिवारी अलोरे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. शोधाशोध सुरू असतानाच दुसऱयादिवशी स्थानिक ग्रामस्थांनी धरणाच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. भाऊ मनीष याने हा गणेशचाच मृतदेह असल्याचे सांगितले.

गणेशच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. भाऊ मनीष हा खासगी कंपनीत काम करतो, तर गणेश हाही रोजगार करून घरच्या परिस्थितीला हातभार लावत होता. आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. गणेशच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवगण, पी. सी. ठीक करत आहेत.

दरम्यान, धरणावरील चौकीदार सुभाष साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार धरणावर येणारे तरूण मद्यप्राशन करून आम्हाला अपशब्द वापरून शिविगाळही करतात. याबाबत पोलीस पाटील, पोलीस स्थानक व सरपंच यांना पत्रव्यवहार करूनही कोणतीच ठोस कारवाई केली जात नाही.

हुल्लडबाजीला आवरणे गरजेचे

पावसाळा सुरू झाला की पावसाळी पर्यटनासाठी तालुकावासियांची पावले शहरापासून बारा कि. मी. अंतरावर असलेल्या अडरे धरणाकडे वळतात. धरणाच्या सांडव्यावरून कोसळणारे पाणी हे धबधब्याप्रमाणे असल्याने चिमुकल्यांसह आबालवृध्दही येथे गर्दी करतात. मात्र यामध्ये तरूण या सांडव्याबाहेर कोसळणाऱया पाण्यापेक्षा सांडव्याच्या भिंतीवरून थेट धरणातच उडय़ा मारतात. यातच धरणात मगरींचा वावर असल्याने दोन्ही धोके समोर असताना आणि पाटबंधारे, ग्रामपंचायतीने तसे सूचना फलक लावलेले असताना अनेक तरूण हुल्लडबाजी करत असतात. त्याच्या या हुल्लडबाजीमुळे अनुचित प्रकार घडल्यानंतर हे धरण बदनाम होताना दिसते. यापूर्वीच अशा अनेक घटना येथे घडलेल्या असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

पाटबंधारे विभागाला बंदीबाबत पत्रव्यवहार करणार ः निशा जाधव

धरणात पोहण्यास बंदी असून तसा फलक धरणाच्या परिसरात लावण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून ही बंदी आणखी कडक करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

Related posts: