|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » टपाल विभाग आता महसूली सेवा क्षेत्रात!



टपाल विभाग आता महसूली सेवा क्षेत्रात! 

आधारकार्ड दुरूस्ती आता तालुका टपाल कार्यालयात,

लवकरच नवीन नोंदणीही होणार

अपुऱया मनुष्यबळाची मात्र चिंता

राजगोपाल मयेकर /दापोली

अपुऱया मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेल्या टपाल विभागात आता आधारकार्ड दुरूस्तीची सेवाही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे ही सेवा नवीन आधारकार्ड नोंदणीपर्यंत विस्तारित करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे टपाल विभागाने बँकींग सेवेबरोबरच आता महसूली सेवा क्षेत्रातही भरारी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

जिह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर येथील तालुका टपाल कार्यालयात आधारकार्ड दुरूस्तीची सेवा सुरू करण्यात आली आहे. देवरूख येथेही लवकरच ही सेवा सुरू होणार असून टप्प्याप्प्याने संपूर्ण जिह्यातील तालुका टपाल कार्यालयात त्याची अंमलबजावणी होणार आहे. ही सेवा यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यानंतर नवीन आधारकार्ड नोंदणीचे कामही टपाल कार्यालयांत सुरू होणार आहे. मुळात आधारकार्डची कामे महसुली संबंधित सेवा क्षेत्रात समाविष्ट होतात. त्याचे व्यवस्थापन खासगी कंत्राटी कंपनीकडून होत असले तरी प्रशासकीय यंत्रणेवरील कामाचे ओझे वाढू न देण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर टपाल कार्यालयांचे गावोगाव पसरलेले जाळे आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन आता आधारकार्डची कामे टपाल विभागाकडे देण्यात आली आहेत. पण याची अंमलबजावणी करताना अपुऱया मनुष्यबळाच्या समस्येवर मात्र वरिष्ठ स्तरावरून अजून कोणतीच हालचाल झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिह्यात सध्या 120 टपाल कर्मचाऱयांची पदे रिक्त आहेत. पण नवीन योजना राबवताना याचा विचार वरिष्ठ स्तरावर झालेला नसल्याचे संकेत आहेत. जिह्यात उपलब्ध कर्मचाऱयांना तातडीने प्रशिक्षण देऊन ही सेवा याच आठवडय़ात सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच्या भरती प्रक्रियांत आलेल्या अडचणींमुळे मनुष्यबळाचा तुटवडा येथील सर्वच कार्यालयात जाणवतो आहे. मात्र याही परिस्थितीत ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या टपाल विभागाने आता महसुली सेवेचे मानाचे पानही आपल्या शिरपेचात खोवले आहे. यापूर्वी बँकींग सेवांमुळे लोकांची टपाल कार्यालयातील रीघ वाढलेली होती. आता आधारकार्डच्या कामांमुळे यात आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सेवेबाबत माहिती देताना रत्नागिरीचे पोस्टमास्तर रविंद्र दामले यांनी सांगितले की, या नवीन सेवेमुळे पोस्टातही आधारकार्ड दुरूस्ती शक्य होणार आहे. एकाच अर्जावर फोटो, पत्ता, जन्मतारीख, दूरध्वनी अशा विविध दुरूस्तीची माहिती अर्जदाराला भरावी लागणार आहे. या सेवेसाठी 25 रूपये आकारले जाणार असल्याने सर्वसामान्य नागरीक मोठय़ा संख्येने या सेवेचा लाभ घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरूवातीला आधारकार्ड नोंदणीच्यावेळीच सदोष माहिती भरली गेल्याने आज दुरूस्तीची नामुष्की कार्डधारकावर येऊन ठेपली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!