|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अल्पसंख्याकांचा वाढता छळवाद थांबवा

अल्पसंख्याकांचा वाढता छळवाद थांबवा 

सावंतवाडी : देशात दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच इतर अल्पसंख्याक नागरिक, महिलांवर सुरू असणारे वाढते अत्याचार व अन्याय यामुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण असल्याचा आक्षेप घेत या प्रवृत्तीविरोधात ‘आम्ही भारतीय’ मंचातर्फे शनिवारी सावंतवाडीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. अन्याय व अत्याचार करणाऱया प्रवृत्तींचा निषेध करत अशा प्रवृत्तीचा शासनाने बिमोड करावा. दलित, अल्पसंख्याक, आदिवासी महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे करण्यात आली.

येथील बॅ. नाथ पै व्यापारी संकुलाकडून सकाळी 11 वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतांनाही मोठय़ा संख्येने ख्रिश्चन, मुस्लिम, दलित, आदिवासी, महिला व पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. बॅ. नाथ पै सभागृहात सर्वांनी एकत्र येऊन ‘संविधान’ आणि ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा म्हणून हल्ला करणाऱया प्रवृत्तींचा निषेध म्हणून तोंडाला काळय़ा पट्टय़ा बांधत मोर्चाला सुरुवात केली. हा मोर्चा बाजारपेठ, सालईवाडा ते मिलाग्रीस स्कूल, रामेश्वर प्लाझा, पालिका मार्गे गांधीचौक ते प्रांताधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वीय्य सहाय्यक अर्जुन मोडक यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रांताधिकारी खांडेकर यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.

यात ‘आम्ही भारतीय’ मंचचे प्रा. अल्ताफ खान, अन्वर खान, ऍड. संदीप निंबाळकर, फादर एलियास रॉड्रिक्स, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, तानाजी वाडकर, सुभाष गोवेकर, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, प्रा. प्रवीण बांदेकर, हरिहर वाटवे, नीला आपटे, समीर बेग, सूरज खान, अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष ऍन्थोनी डिसोजा, नगरसेविका शुभांगी सुकी, दीपाली सावंत, भारती मोरे, गोविंद वाडकर, मधुकर मातोंडकर, आग्नेल डिसोजा, क्लारा डिसोजा, महम्मद करोल, संजय देसाई, पद्मा फातर्पेकर, रफिक मेमन, मुश्ताक बागवान, समीर शेख, आसिफ बिजली, थॉमस पिंटो, आयरिन डिसा, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, अब्दुल शेख, नासीर सोनूर, ग्रेगरी डॉन्टस, अल्ताफ मेमन, महेश पेडणेकर, लुईजा डिसोजा, सनी परेरा, मेहमूद रखांजी, राजू पटेल, पुंडलिक राणे, उत्तम नेरुरकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

यावेळी मोर्चेकऱयांनी ‘हम जिंदा है हमे जिने दो’, ‘हिंदू-मुस्लिम-सिख-इसाई न करे झुंडशाही’, ‘मानव-मानव एकसमान, भारत मा के सब संतान’, ‘मानवता संकटात आहे, तिला वाचवा’, अशा मजकुराचे फलक हाती घेतले होते.

धर्मनिरपेक्षतेला धोका!

प्रांताधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलिकडच्या काही वर्षात भारताची बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्ष ही ओळख नष्ट करून एकच एक ओळख लादण्याचा प्रयत्न कट्टर धर्मांध प्रवृत्तींनी सुरू केला आहे. त्यातून विवेक, विज्ञान, बुद्धिनिष्ठा यासारख्या लोकशाही मूल्यांवर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, पत्रकार, बुद्धिजीवी यांच्या हत्या राजरोसपणे केल्या जात आहेत. शिवाय त्यांचे मारेकरी उघड करण्याबाबतही उदासीनता दाखविली जात आहे. याच बरोबरीने दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन यांसारख्या समूहावर बहुसंख्याकांची संस्कृती लादण्याचा आणि त्याला विरोध केल्यास त्यांना संपविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या देशात गेल्या काही वर्षात अशाप्रकारे सामूहिकपणे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींवर हिंसक हल्ले करून ठार मारण्याचे प्रकार वाढले आहेत. दररोज देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात वेगवेगळय़ा भावनिक कारणांखाली कधी गोरक्षा नावाने, कधी देवाधर्माच्या नावाने तर कधी देशभक्तीच्या नावाने सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना लक्ष्य केले जात आहे.

दलित स्त्रियांची काढलेली धिंड, रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त होण्याइतपत मानसिक त्रास देणे, नितीन आगे या विद्यार्थ्याला प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जीवानिशी संपविणे, बुलढाण्यातील चर्मकार महिलेवरील अत्याचार, बीडमधील मातंग आणि बौद्ध मुलींवरील बलात्कार यांसारख्या दलित समाजाला वेठीस धरणाऱया असंख्य घटना घडतांना दिसत आहेत.

ओरिसामधील गजपती जिल्हय़ातील अबासिंग गावात 18 जून 2017 रोजी तेथील चर्चवर हल्ला करून तीन हजार गावकऱयांच्या समूहाने ख्रिश्चन समाजातील एक मुलगी मधुश्मिता भुयाण हिला बेदम मारहाण केली. या हल्लेखोरांनी तेथील खिश्चन समाजाकडून जबरदस्तीने करारनाम्यावर सहय़ा करून घेतल्या. त्यामध्ये ख्रिश्चन समाजाने पोलीस व तेथील बहुसंख्याक यांच्या परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम घेऊ नये, येशूची पूजा, प्रार्थना करण्यासाठी धर्मगुरुंना निमंत्रित करू नये, तसेच कोणतीही तक्रार कोर्टापर्यंत नेऊ नये, अशा जाचक अटी घातल्या, असेही निवेदनात नमूद केले आहे.

Related posts: