|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला उपांत्य फेरीत

भारतीय महिला उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ डर्बी

शनिवारी मिताली राजच्या भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघावर 186 धावांनी मात करत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार मिथाली राजचे (123 चेंडूत 109) धडाकेबाज शतक आणि वेदा कृष्णमूर्तीच्या जलद 70 धावांच्या बळावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युतरादाखल खेळताना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 25.3 षटकांत 79 धावांवर संपुष्टात आला. शानदार शतकी खेळी साकारणाऱया कर्णधार मिताली राजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 भारताने विजयासाठी ठेवलेल्या 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुजी बेट्स (1) व रिचेल प्रिस्ट (5) स्वस्तात तंबूत परतल्या. यानंतर, इतर फलंदाजांनी राजेश्वरीच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरश: गुडघे टेकले. किवीज संघातर्फे सॅटरवेटने सर्वाधिक 26 धावांचे योगदान दिले. किवीज संघाच्या केवळ तीन फलंदाजाना दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतर महिला फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केल्याने किवीज संघाचा डाव अवघ्या 79 धावांवर संपुष्टात आला. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाडने 5, दीप्ती शर्माने 2 तर झुलन, शिखा व पुनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयासह भारत उपांत्य फेरीत पोहोचला असून भारतासमोर आता विश्वचॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

  प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताची 8 षटकात 2 बाद 21 अशी दैना उडाली होती. मात्र, मिथाली व हरमनप्रीत कौर (60) यांनी तिसऱया गडय़ासाठी 132 धावांची भागीदारी साकारल्याने संघासाठी दिलासा लाभला. वेदा कृष्णमूर्तीची 45 चेंडूतील जलद 70 धावांची खेळी विशेष महत्त्वाची ठरली.

वेदाने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना 7 चौकार व 2 उत्तूंग षटकारही फटकावले. मिथालीचे 184 व्या सामन्यातील 6 वे शतक मात्र अर्थातच विशेष लक्षवेधी ठरले. तिने 123 चेंडूंचा सामना करताना 109 धावांचे योगदान दिले. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यातही तिने वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावा जमवणारी पहिली महिला फलंदाज बनण्याचा मान प्राप्त केला होता. या स्पर्धेत ती विशेष बहरात असून 3 अर्धशतके व एकदा 46 धावा तिने फटकावल्या आहेत.

प्रारंभी, सांगलीची स्मृती मानधना मात्र स्वस्तात बाद झाली. तिला केवळ 11 दावा जमवता आल्या. पूनम राऊतने देखील केवळ 4 धावांवरच तंबूचा रस्ता धरला. या दोन्ही सलामीवीरांनी निराशा केल्याने संघ अडचणीत जरुर होता. मात्र, नंतर मिथाली व हरमनप्रीत यांनी प्रारंभी डाव सावरला व नंतर एकदा जम बसल्यानंतर फटकेबाजी देखील केली. हरमनप्रीतने संथ फलंदाजी केली असली तरी तिची साथ तितकीच महत्त्वाची ठरली. तिने 90 चेंडूत 7 चौकारांसह 60 धावा जमवल्या.

या उभयतांच्या फलंदाजीमुळे भारतीय संघ एकवेळ 36 षटकात 2 बाद 152 अशा मजबूत स्थितीत होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सेट झालेल्या हरमनप्रीतसह दीप्ती शर्माला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. कृष्णमूर्तीवर मात्र याचा फारसा परिणाम झाला नाही. तिने दणकेबाज फलंदाजी करत किवीज गोलंदाजांचा चोख समाचार घेतला. जवळपास प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्यावर भर देत तिने प्रतिस्पर्ध्यांवर सातत्याने दडपण राखले. शेवटच्या षटकात भारताने 4 चेंडूंच्या अंतरात 8 धावांमध्ये 3 बळी गमावले, हे न्यूझीलंडसाठी मोठे यश ठरले. किवीज संघातर्फे ऑफस्पिनर लेग कॅस्पेरेकने सर्वात किफायतशीर गोलंदाजी साकारत 3 बळी घेतले. याशिवाय, हन्नाह रोव्हे व लिया तहूहू या मध्यमगती गोलंदाजांनी अनुक्रमे 2 व 1 बळी घेतले.

धावफलक

भारतीय महिला : स्मृती मानधना त्रि. गो. रोव्हे 13 (24 चेंडूत 2 चौकार), पूनम राऊत झे. मार्टिन, गो. तहूहू 4 (11 चेंडू), मिथाली राज झे. सॅटरवेटे, गो. कॅस्पेरेक 109 (123 चेंडूत 11 चौकार), हरमनप्रीत कौर झे. व गो. कॅस्पेरेक 60 (90 चेंडूत 7 चौकार), दीप्ती शर्मा झे. प्रिएस्ट, गो. रोव्हे 0 (7 चेंडू), वेदा कृष्णमूर्ती धावचीत 70 (45 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), सुषमा वर्मा नाबाद 0, शिखा पांडे झे. सॅटरवेटे, गो. कॅस्पेरेक 0 (1 चेंडू). अवांतर 9. एकूण 50 षटकात 7/265.

गोलंदाजी

कॅस्पेरेक 10-3-45-3, तहूहू 10-1-49-1, रोव्हे 10-3-30-2, सुझी बेट्स 8-0-59-0, केर 10-0-64-0, सॅटरवेटे 2-0-15-0.

 

न्यूझीलंड महिला : 25.3 षटकांत सर्वबाद 79 (सॅटरवेट 26, केटी मार्टिन 12, अमेलिया केर नाबाद 12, अवांतर 1, राजेश्वरी गायकवाड 5/15, दीप्ती शर्मा 2/26, झुलन गोस्वामी 1/14, पूनम यादव 1/12).