|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कारिवडेतील महिलेचा मृतदेह सापडला

कारिवडेतील महिलेचा मृतदेह सापडला 

सावंतवाडी : कारिवडे-पेडवेवाडी येथे शुक्रवारी सकाळी ओहोळातून वाहून गेलेल्या प्रज्ञा प्रभाकर माळकर हिचा मृतदेह रविवारी सायंकाळी आढळला. गेले तीन दिवस प्रज्ञा हिचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी तेरेखोल नदीपात्रात बांद्यापर्यंत शोधमोहीम राबविली होती.

शुक्रवारी सकाळी प्रज्ञा माळकर आपल्या घराजवळील ओहोळात कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी सतत कोसळत असलेल्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहात तिचा पाय घसरून ती वाहून गेली होती. कारिवडे-पेडवेवाडी ओहोळ ते माडखोल धरणाच्या प्रवाहापर्यंत व धवडकी ते बांदा तेरेखोल नदीपात्राच्या दोन्ही बाजूने शोधमोहीम राबविण्यात आली. बाबल आल्मेडा यांची टीम व ग्रामस्थांनी दोन दिवस शोधमोहीम राबविली. तहसीलदार सतीश कदम यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. सरपंच तानाजी साईल, तलाठी मुळीक, पोलीस पाटील प्रदीप केळुसकर, जि. प. सदस्य मायकल डिसोजा, माजी सभापती प्रमोद सावंत, मंगेश तळवणेकर, अशोक माळकर, रामचंद्र माळकर, संदेश माळकर, संजय राऊळ, चंद्रकांत साईल, रवींद्र साईल, बाब गावकर, आलबा घाडी, नागेश गवळी, परशुराम पालव, बंटी आमोणेकर, पप्पू आमोणेकर, वामन गावकर, महेश सारंग यांच्यासह कारिवडे, आंबेगाव, माडखोल, ग्रामस्थांनी शोधमोहिमेत सहभाग घेतला.

रविवारी सकाळपासून पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्याने ओहोळाच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ज्या ठिकाणाहून प्रज्ञा माळकर पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती, तेथून दोनशे मीटर अंतरावर झुडपात माळकर हिचा मृतदेह संदेश माळकर यांना दिसला. घटनास्थळीच डॉ. शिंदे यांनी शवविच्छेदन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, विनायक नाईक आदींनी पंचनामा केला.

अनधिकृत बांधकाम तोडले

ज्या ठिकाणाहून प्रज्ञा माळकर वाहून गेली तेथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वळला होता. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करून हे बांधकाम काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. तहसीलदारांनी संबंधित मालकाला बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, मालकाने ते बांधकाम न काढल्याने रविवारी ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम हटविले.

नगराध्यक्षांना निवेदन देणार!

सावंतवाडी शहरातील मोती तलावाचे पाणी माडखोल नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होते. त्यामुळे नगरपालिकेने तलावाचे पाणी नदीत सोडण्यापूर्वी नदीकाठच्या सर्व गावांना पूर्वकल्पना द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ मंगळवार 18 जुलैला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेणार असल्याची माहिती तळवणेकर यांनी दिली.

Related posts: