|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » क्रिडा » फेडररचे विक्रमी आठवे जेतेपद

फेडररचे विक्रमी आठवे जेतेपद 

वृत्तसंस्था/ लंडन

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विक्रमी आठवे जेतेपद मिळविताना रविवारी झालेल्या अंतिम फेरीत क्रोएशियाच्या सातव्या मानांकित मारिन सिलिकचा 6-3, 6-1, 6-4 अशा सरळ सेट्सनी पराभव केला. त्याचे हे एकूण विक्रमी 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. तसेच या वर्षातील त्याचे हे दुसरे अजिंक्मयपद आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.

आधुनिक युगात ही स्पर्धा जिंकणारा 35 वषीय फेडरर हा सर्वात वयस्कर टेनिसपटू आहे. यापूर्वी ऑर्थर ऍशने 1976 मध्ये ही स्पर्धा जिंकली त्यावेळी तो 32 वर्षांचा होता. फेडररची ही विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळण्याची 11 वी तर ग्रँडस्लॅममधील एकूण 29 वी वेळ होती. या लढतीच्या दुसऱया सेटवेळी तिसरा गेम झाल्यानंतर चेंजओव्हरवेळी सिलिक भावूक झाला आणि त्याच्या डोळय़ांतून अश्रू ओघळू लागले. यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आपल्याकडून अपेक्षिक खेळ होत नसल्याने तो निराशा झाला होता. आपले स्वप्न उद्ध्वस्त होत असल्याचा जाणिवेने त्याला रडू आवरेनासे झाले असावे. त्याने 2014 मध्ये अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळविले त्यावेळी फेडररला त्याने उपांत्य फेरीत हरविले होते. ते त्याचे एकमेव ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. 

दुसऱया सेटनंतर त्याने डाव्या पायाला बँडेज बांधून घेतले. पण त्याचा त्याला काहीच उपयोग झाला नाही. पूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमविता ही स्पर्धा जिंकणारा बियॉन बोर्गनंतरचा पहिला टेनिसपटू बनला आहे. बोर्गने 1976 मध्ये हा पराक्रम केला होता. या सामन्यासाठी रॉयल बॉक्समध्ये नामवंत स्टार्ससमवेत प्रिन्स विल्यम, त्यांची पत्नी केट, अभिनेते हय़ुज ग्रँट, ब्रॅडली कूपर उपस्थित होते. सेकंड सर्व्ह बिनतोड सर्व्हिसवर फेडररने सामना संपवत 1 तास 41 मिनिटे चाललेली ही लढत एकतर्फी जिंकल्यानंतर त्याच्याही डोळय़ांत आंनदाश्रू आले होते. फेडररने याआधी 2012 मध्ये विम्बल्डनचे शेवटचे जेतेपद मिळविले होते. त्यानंतर 2014 व 15 मध्ये त्याला अंतिम फेरीत नोव्हॅक ज्योकोव्हिककडून पराभूत व्हावे लागले होते. त्याने 2003 मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतरची सलग चार वर्षे त्याने जेतेपद स्वतःकडेच राखली होती. यापूर्वी सिलिकविरुद्ध त्याच्या सात लढती झाल्या होत्या. त्यापैकी सहा फेडररने जिंकल्या होत्या. विम्बल्डनमध्ये आठव्यांदा जेतेपद पटकावत फेडररने पीट सांप्रास व विल्यम्स रेनशॉ यांना मागे टाकले आहे. दोघांनी सातवेळा ही स्पर्धा जिंकली होती.

Related posts: