|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा नियोजनसाठी राष्ट्रवादीची खंडाळ्यात खलबते

जिल्हा नियोजनसाठी राष्ट्रवादीची खंडाळ्यात खलबते 

प्रतिनिधी / खंडाळा

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, उमेदवारीबाबत मुंबईनंतर दुसऱया बैठकीत राष्ट्रवादीची खंडाळ्यात खलबते झाली.

  ऐन पावसाळ्यात जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा ज्वर चांगला वाढला आहे, तर निवडणुकीत सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस, सेना- भाजप या पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीच्या निमित्ताने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या राजकीय घडामोडीत नुकतीच मुंबई येथे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. सोमवार 17 रोजी इच्छुक उमदेवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी सायंकाळी खंडाळ्यात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्यासह जिह्यातील राष्ट्रवादीचे आमदार यांची गुप्त बैठक पार पडली. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीबाबतची खलबते रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, यावेळी खंडाळा तालुक्यासह जिह्यात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत इच्छुकांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढू लागली आहे, तर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत.

 खंडाळ्यात झालेल्या बैठकीस कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती मनोज पवार, खंडाळा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, खंडाळ्याचे सभापती मकरंद मोटे, बंडू गाढवे, जावेद पठाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तर बैठकीतील अधिकृत माहीती रात्री उशीरापर्यत मिळू शकली नाही. मात्र, उमेदवार निश्चित झाल्याचे समजते.

Related posts: