|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शाहूनगरमध्ये सलग सहाव्या दिवशीही पाणी नाहीच

शाहूनगरमध्ये सलग सहाव्या दिवशीही पाणी नाहीच 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरा लगत असलेल्या शाहूनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. शाहूनगर परिसरात सुमारे हजार घरे असून सलग पाणी पुरवठा खंडित झाल्याने अनेक जण पाण्याचे टँकर मागवत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून लष्कर पाणी पुरवठा केंद्राला अद्यापही पाईपलाईन ठीक करता न आल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. रविवार असूनही अनेकांना विनाअंघोळीचे रहावे लागले. तसेच पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने अनेकांनी बिसलरीचे मोठे पाण्याचे जार विकत घेतले. शाहूनगर परिसराला पाणी पुरवठा लवकर सुरळीत सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र वामनराव गायकवाड यांनी दिला आहे.

शहरा लगत असलेल्या शाहूनगर परिसरात उच्चभ्रु नागरीकांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आहे. अनेकांकडे पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या मोठय़ा प्रमाणात आहेत. गेल्या सहा दिवसांपासून शाहूनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे तेथील पाणी पुरवठा खंडीत झाला. नागरीकांना एक-दोन दिवसांत पाणी पुरवठा पुर्ववत होईल अशी अपेक्षा होती. परंतु सहाव्या दिवशीही पाणी पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यामुळे अनेक नागरीकांनी संताप व्यक्त केला. पाणी साठवणुकीच्या टाक्या पुर्णपणे रिकाम्या झाल्या असून एwन पावसाळ्यात टँकरने पाणी मागवले जात आहेत. तसेच पिण्यासाठीही पाण्याचे जार विकत घेताना येथील नागरीक दिसत आहेत.

रविवार असल्याने अनेक परगावाला शिकत असणारे विद्यार्थी घरी आले होते. तसेच सुट्टी असल्याने काही पाहुणेही आल्याने शाहूनगर वासियांची चांगली धांदल उडाली होती. अनेकांनी जीवन प्राधिकरण विभागाला समक्ष भेटून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी विनंती केली. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करुन रस्ता रोको ही करण्याच्या तयारीत आता शाहूनगर वासीय दिसत आहेत.

Related posts: