|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजीपाला उत्पादनात सांगे तालुक्याची वेगाने प्रगती

भाजीपाला उत्पादनात सांगे तालुक्याची वेगाने प्रगती 

प्रसाद तिळवे/ नेत्रावळी

भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्याच्या बाबतीत सांगे तालुका आता वेगाने पुढे येत असून राज्य सरकारचे प्रोत्साहन व फलोत्पादन महामंडळाच्या योजना त्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. 2016-17 आर्थिक वर्षात या तालुक्यातील शेतकऱयांनी 80.90 टन भाज्यांचे उत्पन्न घेऊन ते राज्य फलोत्पादन महामंडळाला पुरविले. याशिवाय स्थानिक बाजारपेठेत जी भाजी विकण्यात आली तो आकडा वेगळा आहे.

या विभागाने 2014-15 मध्ये राज्यात फलोत्पादन महामंडळाला सर्वाधिक भाजी पुरविली होती. त्याबद्दल तत्कालिन विभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय पंडित यांना माजी कृषिमंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले होते. सांगे तालुका क्षेत्रफळाने मोठा असला, तरी वनक्षेत्राने तो जास्त व्यापून गेला असून शेतीचे क्षेत्र त्यामानाने कमी आहे. भातशेती, ऊस, नारळ, काजू, सुपारी ही येथील मुख्य पिके आहेत. भाजीपाला लागवडीवर नजर टाकल्यास 2011-12 साली उत्पन्न जेमतेम 1028 किलो इतके होते. व्यावसायिक तत्त्वावर भाज्यांची लागवड तशी नव्हती. पण 2012-13 पासून भाजीपाला लागवडीत शेतकऱयांनी प्रगती केली. फलोत्पादन महामंडळाची भाजीपाला लागवड योजना, भाज्यांची दरनिश्चिती आणि भाजी खरेदी केंद्रांची निर्मिती ही तीन कारणे याबाबतीत महत्त्वाची ठरली आहेत.

आधुनिक पद्धतीने लागवड

सांगेतील नेत्रावळी, कोळंब, भाटी, विचुंद्रे, वाडे-कुर्डी या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली जाते. येथील स्वयंसाहाय्य गट तसेच सुमारे 200 च्या आसपास शेतकरी यात गुंतले आहेत. आधुनिक पद्धतीने व नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी ही लागवड करत आहेत. यात ठिंबक सिंचन, हरितगृह, प्लास्टिकचे आच्छादन घालून लागवड आदींचा समावेश आहे, असे साहाय्यक कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी सांगितले. भाजी लागवड करू इच्छिणाऱयांना हेक्टरमागे 80 हजार रुपये इतके अनुदान देण्याची फलोत्पादन महामंडळाची योजना आहे. अवजारे, पाणीपुरवठय़ासाठी पंप, जलवाहिनी, ठिंबक व तुषार सिंचन पद्धतीसाठी लागणारे साहित्य यांची खरेदी करण्यासाठी तसेच कुंपण घालणे, सेंद्रीय खत तयार करणे याकरिता या योजनेद्वारे अनुदान दिले जाते.

नेत्रावळीचा मोठा वाटा

सांगे तालुक्यात नेत्रावळी व सांगे येथे भाजी खरेदी केंद्रे असून फेब्रुवारी, 2015 मध्ये सुरू केलेले नेत्रावळीतील केंद्र शेतकऱयांना वरदान ठरत आहे. येथील पाच शेतकऱयांनी शेतात प्लास्टिकचे आच्छादन घालून मिरची व भाज्यांची लागवड केली आहे. 2014-15 साली सांगे व नेत्रावळीहून 21 टन हिरवी मिरची फलोत्पादन महामंडळाला पुरविण्यात आली. विशेष म्हणजे बांदवाडा-नेत्रावळी येथील एका महिला स्वयंसाहाय्य गटाने 70 ते 80 हजार रुपयांची भाजी पिकविली. भाजी उत्पादनात नेत्रावळीतील शेतकऱयांचा मोठा वाटा आहे. साळजिणी येथील डोंगराळ भागांतील भिकू वेळीप व नवनाथ वेळीप यांनी यापूर्वी 10 ते 12 टन हिरव्या मिरचीचे उत्पन्न घेतले आहे. रिवण येथील प्रकाश म्हात्रे यांना 2014-15 साली सर्वाधिक भाजी उत्पन्नाचा पुरस्कार मिळाला होता. तिंबले ऍग्रो डेव्हलपमेंटचाही भाजी उत्पादनात मोठा सहभाग राहिला आहे.

आंतरपीक म्हणून भाज्यांची लागवड

शेतकऱयांनी ‘निशा’ जातीच्या मिरचीची लागवड केलेली असून भेंडी, वांगी आदींची उत्तम दर्जाची बियाणे कृषी खात्याकडून पुरविण्यात आलेली आहेत. आंतरपीक म्हणून काही शेतकऱयांनी ऊस व नारळाच्या बागायतीत मिरची, वांगी व भेंडीची लागवड केलेली आहे. भाजी लागवड करणाऱयांमध्ये लघू व मध्यम स्तरावरील शेतकऱयांचा जास्त भरणा आहे. साळजिणीत संकरित जातीच्या वांग्याची लागवड यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे.

2015-16 साली भाज्यांचे उत्पादन 6.12 मेट्रिक टनांवरून 105 पर्यंत वाढल्याची आकडेवारी कृषी खात्याकडे आहे. आजपर्यंत तालुक्यात ज्या भाज्यांचे उत्पन्न घेण्यात आले आहे त्यात हिरवी मिरची, भेंडी, वांगी, काकडी, चिटकी मिटकी, कोकणदुधी, लाल दुधी यासह आले, हिरवी कोथंबीर, टॉमेटो, कांदा, ढब्बू मिरची, वालपापडी, घोसाळी यांचा समावेश आहे. याशिवाय लाल भाजीसह अनेक भाज्या फलोत्पादन महामंडळ घेत नसल्याने त्यांची विक्री स्थानिक बाजारांत केली जाते. त्याचा आकडा मिळू शकत नाही. पावसाळय़ात सांगे, नेत्रावळी, रिवण भागांमध्ये हिरवी मिरची व भाज्यांबरोबर काटेकणंग, करांदे, झाडकणंग, अळूची माडी, सूरण यांचीही लागवड केली जाते. या पिकांसाठीही प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकऱयांकडून होत आहे.

Related posts: