|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘क्रॉसची तोडफोड आपण एकटय़ानेच केली’

‘क्रॉसची तोडफोड आपण एकटय़ानेच केली’ 

प्रतिनिधी/ कुडचडे-मडगाव

2003 पासून आपण गोव्यात विविध ठिकाणी धार्मिक स्थळांची विटंबणा केली. हे कर्म करताना आपण कुणालाच सोबत घेतले नाही. कारण अन्य कुणाला सोबत घेतले असते तर आपले बिंग कधीही फुटू शकले असते. त्यामुळे कुणालाच सोबत न घेता आपण तब्बल 150 धार्मिक स्थळांची विटंबणा केल्याची कबुली फ्रान्सिस उर्फ बॉय परेरा याने पोलिसांना दिली आहे.

पाजीफोंड-मडगाव येथील क्रॉस आपण शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 2.15 च्या दरम्यान मोडल्याची कबुली त्याने दिली आहे. हा क्रॉस मोडल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला होता. ज्यांच्या दारात हा क्रॉस होता ती फॅमिली बुधवार दि. 12 जुलैपासून घरात नव्हती. घर बंद होते. शनिवारी जेव्हा फॅमिली घरी आली, तेव्हा त्यांना हा प्रकार कळून चुकला नंतर त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. काल, रविवारी पोलिसांनी फ्रान्सिस उर्फ बॉय परेरा याला मडगावात आणून त्याच्याकडून हा क्रॉस मोडल्याची खातरजमा पोलिसांनी करून घेतली.

साथीदार असता तर एव्हाना सापडलो असतो

फ्रान्सिस उर्फ बॉय याने 2000 साली एका व्यक्तीवर गोळय़ा झाडल्या होत्या. या प्रकरणात त्याला अटकही झाली होती. त्यानंतर 2003 मध्ये त्याची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर त्याने धार्मिक स्थळांची विटंबणा करण्याचे कर्म सुरू केली. गेली जवळपास 14 वर्षे तो धार्मिक स्थळांची विटंबणा करण्यात गुंतला होता. धार्मिक स्थळांची विटंबणा करण्याच्या कटात आपण इतर कोणालाच सोबत घेतले नाही. एकटय़ानेच हे कर्म केले, अन्य कुणाला सोबतीला घेतले असते तर आपण गजाआड झालो असतो. सोबत घेतलेली व्यक्ती कधी तरी पोलिसांना सापडली असती किंवा आपल्याशी भिनसले असते तर त्यांने पोलिसांना कल्पना दिली असती. त्यामुळे आपण कधीच कुणाला सोबत घेतले नाही. रात्री, बारा वाजल्यानंतर आपले हे कारनामे सुरू व्हायचे ते पहाटेपर्यंत चालायचे. हे कर्म करताना आपल्याला कधीच वाईट वाटले नाही अशी बेधडक कबूली तो पोलिसांना देत आहे.

मडगावातील क्रॉसची तोडफोड करण्यापूर्वी शुक्रवार दि. 14 रोजी रात्री 9.30 वाजता कुडचडेहून भाडे घेऊन फ्रान्सिस परेरा मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर आला होता. भाडेकरूना कोकण रेल्वे स्थानकावर सोडून तो आपल्या मारूती ओमनीमध्ये झोपी गेला. मध्यरात्री 2 वाजता उठला व पाजीफोंड येथे आला. यावेळी या परिसरात पोलिसांची जीप गस्त घालत होती. पोलीस जीपच्या भोंग्याचा आवाज ऐकून त्याने पहिल्या प्रयत्नान क्रॉसची तोडफोड करण्याचा बेत रद्द केला.

पोलीस गस्तीवर असल्याने, त्याने पाजीफोंड परिसरातच गाडी फिरवली व होली स्पिरीट चर्चमार्गे जुन्या बाजारात गेला, तेथून एसजीपीडीए मार्केट जाऊन पुन्हा आला व हय़ा क्रॉसची तोडफोड केली. नंतर त्याने कुडतरी मार्गे माकाझन गाठले.

यावेळी त्याचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला, पण त्याची कल्पना त्याला लागू दिली नाही. माकाझन येथे क्रॉसची तोडफोड करण्याचा बेत त्याने आखला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व कुडचडे पोलीस स्थानकात नेले. शनिवारी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन, घरातून अन्य पुरावे गोळा केले.

बातम्यांची कात्रणे काढून ठेवत होता

क्रॉसची तोडफोड केल्यानंतर दुसऱया दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱया बातम्या वाचून तो आसुरी आनंद घ्यायचा. वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणेसुद्धा त्याने जपून ठेवली होती. ती देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, काल पोलिसांनी त्यांच्याकडून दक्षिण गोव्यात धार्मिक स्थळांची विटंबणा केली, त्याची माहिती गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणी त्याने धार्मिक स्थळांची विटंबणा केली, त्या ठिकाणी त्याला नेऊन चौकशी केली जात आहे.

धार्मिक स्थळांची विटंबणा करण्यात एकच व्यक्ती गुंतली असावी यावर सद्या तरी कुणाचा विश्वास बसत नाही. या प्रकरणात अन्य कुणाच हात असावा या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास करावा अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी देखील काल पत्रकारांशी बोलताना, धार्मिक स्थळांची विटंबणा करण्याच्या प्रकारात अन्य कुणाजवळ माहिती असल्यास, त्यांनी ती पोलिसांना द्यावी, पोलीस तपास करतील असे सांगितले. सद्या तरी या प्रकरणात फ्रान्सिस उर्फ बॉय परेरा ही एकच व्यक्ती गुंतल्याची माहिती पुढे आल्याचे ते म्हणाले.