|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » परप्पन अग्रहारमधील तीन कैद्यांना बेळगावला हलविले

परप्पन अग्रहारमधील तीन कैद्यांना बेळगावला हलविले 

प्रतिनिधी / बेळगाव

बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहातील भ्रष्टाचारावरुन कारागृह विभागाचे राज्य पोलीस महासंचालक सत्यनारायण राव व डीआयजी डी. रुपा यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. याचाच परिणाम म्हणून परप्पन अग्रहारमधील 21 कैद्यांना राज्यातील विविध कारागृहांमध्ये हलविण्यात आले आहे. त्यापैकी तीन कैद्यांना रविवारी बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

डीआयजी डी. रुपा यांनी कारागृहातील भ्रष्टाचाराबद्दल कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक सत्यनारायण राव व राज्य पोलीस महासंचालक आर. के. दत्ता यांना पाठविलेल्या दोन अहवालांमुळे या दोन आयपीएस अधिकाऱयांमध्ये सध्या खडाजंगी सुरु आहे. परस्परांविरुध्द आरोप करण्यात येत आहेत. कारागृहातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी विनयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कैद्यांना लंगडत जावे लागले

चौकशी सुरु होण्याआधीच परप्पन अग्रहार कारागृहामधील 21 कैद्यांना विविध कारागृहांमध्ये हलविण्यात आले. म्हैसूर येथील कारागृहात 4, बळ्ळारी 3, धारवाड 4, गुलबर्गा 4, विजापूर 3 आणि हिंडलगा येथील कारागृहात 3 कैद्यांना हलविण्यात आले आहे. यापैकी अनंतमूर्ती, बालू व लॉंग बाबु या तिघा जणांना कडक सुरक्षा व्यवस्थेत रविवारी दुपारी बेळगावला आणण्यात आले. कारागृहासमोर पोलिसांचे वाहन उभे करण्यात आल्यानंतर या कैद्यांना वाहनातून उतरता आले नाही. वाहनांपासून कारागृहाच्या प्रवेद्वारापर्यंत त्यांना लंगडत जावे लागले. त्यामुळे या कैद्यांना मारहाण झाल्याचा संशय मानवी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. डी. रुपा यांनी परप्पन अग्रहारला भेट दिली त्यावेळी ज्यांनी त्यांना तेथील भ्रष्टाचाराबद्दल सर्व माहिती दिली, तशा कैद्यांना हेरुन चौकशी सुरु होण्याआधीच अन्य कारागृहात हलाविण्यात आले आहे.

2 कोटी रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप

परप्पन अग्रहारचे अधिक्षक कृष्णकुमार यांच्यावर थेट आरोप करण्यात आला आहे. बनावट स्टॅम्प प्रकरणातील आरोपी करीम तेलगी व तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांना कारागृहात सर्व सुखसोयी पुरविल्याचा आरोप डी. रुपा यांनी आपल्या अहवालात केला होता. सत्यनारायण राव यांच्यावर 2 कोटी रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप केल्यानंतर या दोन अधिकाऱयांमध्ये सध्या खडाजंगी सुरु आहे.

Related posts: