|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » क्रिडा » ‘साई’च्या प्रशिक्षकांना द्यावी लागणार ‘फिटनेस टेस्ट’

‘साई’च्या प्रशिक्षकांना द्यावी लागणार ‘फिटनेस टेस्ट’ 

40 वर्षांवरील सुमारे 1 हजार प्रशिक्षकांसमोर बाका प्रसंग,  तंदुरुस्ती सिद्ध न केल्यास थेट ‘घरी’!

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या 40 वर्षावरील सुमारे 1 हजार प्रशिक्षकांना येत्या सप्टेंबरपर्यंत कष्टप्रद वैद्यकीय आणि शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागणार असून या तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्यास क्रीडा खाते त्यांना थेट घरी पाठवणार आहे. या प्रशिक्षकांची सहनशक्ती, लवचिकता व मजबुती यात तपासली जाणार असून देशभरात तीन टप्प्यांमध्ये ती अंमलात आणली जाणार आहे. युवा खेळाडूंना ढेरपोटय़ा, अकार्यक्षम प्रशिक्षकांऐवजी सक्षम, तंदुरुस्त व स्वतःचे उदाहरण समोर ठेवून मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक लाभावेत, अशी भारतीय क्रीडा प्राधिकरणाची अपेक्षा आहे.

सदर तंदुरुस्ती चाचणी 3 टप्प्यातून राबवली जाणार असून त्यातील पहिला टप्पा उत्तर विभागातून यापूर्वीच सुरु केला गेला आहे. प्रशिक्षकांची सहनशक्ती जोखण्यासाठी त्यांना 800 मीटर्स धावण्याची चाचणी घेतली जात असून याशिवाय त्यांची वैद्यकीय चाचणीही होत आहे. रक्तदाब, मधुमेहाच्या चाचणीबरोबरच त्यांना ऍरोबिक फिटनेस टेस्टलाही सामोरे जावे लागणार आहे. उंची, वजन व बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) निकषावर देखील त्यांच्या तंदुरुस्तीचा दर्जा ठरवला जाणार आहे.

याशिवाय, बायसेप्स, ट्रायसेप्स, सबस्कॅर्पलर व सुप्रॅलियाक टेस्टही या प्रक्षिकांना पार पाडावी लागणार आहे. जीटीएमटी (जनरल थियरी अँड मेथड्स ऑफ स्पोर्ट्स ट्रेनिंग), फिजिओलॉजी अँड ऍन्थ्रोपोमेन्ट्री यांच्या सहकार्याने शास्त्र विभागातील तज्ञांची समिती देशभरात सदर चाचण्या घेत आहे.

‘कनिष्ठ दर्जाच्या एखाद्या प्रशिक्षकाला येथे अनुकूल निकाल दिला जाऊ नये, यासाठी आणखी एक समांतर समिती देखील या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. त्यामुळे, साई प्रशिक्षकांचा वस्तुस्थितीजन्य अहवाल मिळू शकेल’, असा साईचा होरा आहे. साई व्यवस्थापकीय समितीचे सदस्य बीव्हीपी राव अंतिम निर्णय प्रक्रियेसाठी 5 सदस्यीय समितीचे अध्यक्षपद भूषवतील. मात्र, प्रत्यक्ष प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग नसेल, असे एका सूत्राने यावेळी नमूद केले.

‘राव यांच्या अध्यक्षतेखालील समिती ठरवून दिलेले निकष अंमलात आणेल आणि जे प्रशिक्षक या तंदुरुस्ती चाचणीत नापास होतील. त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली जाईल’, असेही या सूत्राने म्हटले. राव हे निवृत्त आएएस पदाधिकारी असून गत आठवडय़ात संपन्न झालेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांची नियुक्ती जाहीर केली गेली. प्रशिक्षकांची चाचणी घेत असताना ऍथलिट्सची मतेही आजमावली जाणार आहेत. साईच्या प्रशिक्षकांची तंदुरुस्ती चाचणी घेण्याची मूळ कल्पना केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांची आहे. रायपूर भेटीदरम्यान तेथील स्थानिक प्रशिक्षक अकार्यक्षम असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी देशभरातील साई संलग्न प्रशिक्षकांची तंदुरुस्ती पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला होता.

Related posts: