|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला अर्जेन्टिनाकडून पराभूत

भारतीय महिला अर्जेन्टिनाकडून पराभूत 

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग

रविवारी येथे झालेल्या महिलांच्या हॉकी विश्वलीग उपांत्य स्पर्धेतील आपल्या गटातील शेवटच्या सामन्यात अर्जेटिनाने भारताचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. आता भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंग्लंड विरूद्ध मंगळवारी 18 जुलैला होणार आहे.

जागतिक महिला हॉकी संघांच्या मानांकनात तिसऱया स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाने या सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक आणि जलद खेळावर भर दिला होता. अर्जेंटिनाने दुसऱयाच मिनिटाला रोसिओ सांचेझच्या गोलवर खाते उघडले. भारतीय संघाची गोलरक्षक सविताला या सामन्यात अर्जेंटिनाचे हल्ले थोपविताना खूपच अवघड गेले. सांचेझने भारतीय गोलरक्षकाला हुलकावणी देत अर्जेंटिनाचे खाते उघडले. यानंतर भारताला चौथ्या मिनिटाला गोल करण्याची पहिली संधी लाभली होती पण अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने वंदना कटारिया आणि नमिता टोप्पो यांची ही चाल अपयशी ठरविली. पहिल्या 15 मिनिटांत गोलरक्षक सविताने अर्जेंटिनाचे चार हल्ले थोपविले होते. सहाव्या मिनिटाला अर्जेंटिनाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. 14 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा दुसरा गोल मारिया ग्रॅनेटोने केला. 23 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण राणीचा हा फटका अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने थोपविला. 25 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पंचांनी पेनल्टी स्टोक बहाल केला आणि या संधीचा अर्जेंटिनाच्या नोएल बॅरीओन्यूओने फायदा उठवित अचूक गोल नेंदविला. सामन्यातील शेवटच्या  15 मिनिटांच्या सत्राला प्रारंभ होण्यापूर्वी अर्जेंटिनाने भारतावर 3-0 अशी आघाडी घेतली होती. शेवटच्या 15 मिनिटात अर्जेंटिनाने सलग चढाया करून भारताची बचावफळी खिळखिळी केली. दरम्यान अर्जेंटिनाने हा सामना 3-0 असा एकतर्फी जिंकून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अद्याप अपराजित राहिला आहे.