|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » आशियाई चॅम्पियन मनप्रीत उत्तेजक चाचणीत दोषी

आशियाई चॅम्पियन मनप्रीत उत्तेजक चाचणीत दोषी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे महिन्याच्या प्रारंभी भुवनेश्वरमधील आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेले सुवर्ण तिला गमवावे लागेल, हे जवळपास स्पष्ट आहे. डिमेथिबुटीलॅमिन या उत्तेजकाचा अंश तिच्या चाचणीत आढळून आला. नाडाने दि. 1 ते 4 जून या कालावधीत झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय चॅम्पियनशिपदरम्यान चाचणीसाठी तिच्याकडून नमुने घेतले होते.

वाडा कलमानुसार, डिमेथिबुटीलॅमिनचा स्पेसिफाईड सबस्टन्समध्ये समावेश नसल्याने मनप्रीतचे तडकाफडकी निलंबन केले गेलेले नाही. मात्र, ब चाचणीत ती दोषी आढळली असल्याने भारताला आशियाई सुवर्ण गमवावे लागणार आहे. ‘जूनमध्ये फेडरेशन चषक स्पर्धेदरम्यान घेतलेल्या चाचणीत मनप्रीत दोषी आढळली. तिच्या मूत्र नमुन्यात उत्तेजकाचे अंश आढळून आले आहेत. नाडाने याची आम्हाला रितसर कल्पना दिली आहे’, असे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱयाने नमूद केले. मनप्रीतचे पती करमजीत, हेच तिचे प्रशिक्षकही असून त्यांनी मात्र याला दुजोरा देणे टाळले. ‘अद्याप आम्हाला याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही’, असा दावा त्यांनी केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादा ऍथलिट डिमेथिबुटीलॅमिनचा अंश आढळल्याने दोषी ठरल्याची ही पहिलीच वेळ आहे. या उत्तेजकाचा काहीसा संबंध मेथिल्हेक्सान्माईनशी येतो, यापूर्वी 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान, मेथिल्हेक्सान्माईनचे सेवन काही क्रीडापटूंनी केल्याचे उघडकीस आले होते.

सध्या दोषी आढळलेल्या मनप्रीतने पुढील महिन्यात लंडनमध्ये आयोजित विश्व चॅम्पियनशिपसाठी यापूर्वीच पात्रता संपादन केली आहे. मात्र, उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तिचा त्या स्पर्धेतील सहभागही अर्थातच धोक्यात आलेला आहे. गोळाफेकीत उत्तम प्राविण्य मिळवलेल्या मनप्रीतने जिन्हुआ-चीन येथील आशियाई ग्रा. प्रि. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 18.86 मीटर्स फेकीच्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले व वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपली जागा निश्चित केली. नंतर तिने फेडरेशन चषक, आशियाई चॅम्पियनशिप व सोमवारी सांगता झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्येही प्रत्येकी 1 सुवर्णपदकाची कमाई केली. आता मात्र उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ती वादाच्या भोवऱयात सापडली आहे.

Related posts: