|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तरुण भारत वृत्तपत्र विपेता ते सीए….

तरुण भारत वृत्तपत्र विपेता ते सीए…. 

येळ्ळूरच्या मल्लिकार्जुन हलीजोळीचा थक्क करणारा प्रवास   वयाच्या सहाव्या वर्षापासून वृत्तपत्र विक्री

गंगाधर पाटील / बेळगाव

पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता पहाटे संपूर्ण येळ्ळूर गावामध्ये तरुण भारत वृत्तपत्र घरोघरी पोहोचवून आज सीएसारख्या कठीण परीक्षेत उत्तुंग यश मिळविणाऱया तरुणाचा प्रवास साऱयांनाच थक्क करून सोडतो. त्याच्यावर या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. येळ्ळूरच्या या तरुणाने युवा पिढीसमोर एक आदर्श दाखवून दिला असून जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीत माणूस आपले लक्ष्य साध्य करू शकतो, हेच मल्लिकार्जुनने दाखवून दिले आहे.

मल्लिकार्जुन हलीजोळी (वय 29, रा. लक्ष्मी गल्ली, येळ्ळूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. मल्लिकार्जुन वयाच्या सहा वर्षांपासून दररोज पहाटे घरोघरी वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करतो. इतक्मया खडतर परिश्रमातून त्याने ही झेप घेतली आहे. चिंतामणराव हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून लिंगराज महाविद्यालयामधून बी.कॉमची पदवी घेतली. त्यानंतर सीएची परीक्षा देऊन त्याने यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाला कुटुंबाबरोबरच इतरांची मोलाची साथ लाभली आहे. 

मल्लिकार्जुन मूळचा पाच्छापूर (ता. हुक्केरी) येथील मात्र आई अंगणवाडी शिक्षिका असल्यामुळे तो येळ्ळूरमध्येच राहिला. त्याचे मामा शंकर नंदी यांचा वृत्तपत्र टाकण्याचा व्यवसाय सांभाळत त्याने हे यश संपादन केले. त्याचे मामा शिक्षक झाल्यानंतर संपूर्ण काम मल्लिकार्जुन याने स्वतःकडे घेतले. 

येळ्ळूरसारख्या मोठय़ा गावात प्रत्येकाच्या घरी वेळेत वृत्रपत्र पोहोचविण्याचे काम केले. तो मीतभाषी असून त्याच्या अंगी नेहमीच नम्रता असते. यामुळे साऱयांचाच तो आवडता आहे. 

दररोज विक्री केलेल्या वृत्तपत्राचे बिल तो रविवारी जमा करतो. त्यानंतर तरुण भारतकडे ते बिल पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करत आला आहे. शिक्षणातील अडीअडचणी दूर करत आज जी गरुड झेप घेतली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. वडील बाळकृष्ण हे रेशीम विभागात काम करत होते. ते निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांचे निधन झाले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी मल्लिकार्जुनवर आली. त्या कठीण परिस्थितीतून त्याने सीएची परीक्षा दिली. काहीवेळा अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करत त्याने अखेर यश संपादन केले आहे. यासाठी चार्टर्ड अकौंटंट महेश उडदार, जगदीश कामकर, कुंतूसागर हरडी यांसह त्याचा भाऊ मारुती आणि बहीण मनीषा यांनी मोलाची मदत केल्याचे त्याने सांगितले.

सायकलवरूनच प्रवास

शिक्षण म्हटले की डोनेशन, क्लासेस हे आव्हान प्रत्येक पालकाच्या डोळय़ासमोर उभे राहते. मात्र मल्लिकार्जुनने या साऱयाला तोंड देत हे यश संपादन केले आहे. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस निश्चितच यश संपादन करू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. सकाळी सायकलवरून वृत्तपत्र टाकून त्यानंतर सायकलवरूनच शिक्षणासाठी ये-जा करून त्याने हा पल्ला गाठला आहे.

वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय म्हटले की वर्षातून केवळ तीन ते चार दिवसच सुटी मिळते. त्यामुळे वृत्तपत्र टाकण्याचे काम करणाऱयाला सवड ही नसतेच. अनेक गोष्टींचा आनंद टाळून जगणे हे काहीसे अवघड असते. आपल्या इच्छा असताना त्या इच्छांकडे दुर्लक्ष करून हे काम पहाटे उटून करावे लागते. बऱयाचवेळा जोरदार पावसातून वृत्तपत्र न भिजवता पाण्यातून आणि चिखलातून वाट काढावी लागते. त्यानंतर ते वृत्तपत्र प्रत्येकाच्या घरात पोहोचते. बऱयाचवेळा अनेक जण काहीसा उशीर झाला तरी ओरडतात. पण त्याकडे कानाडोळा करून आपले काम करावे लागते.

परिश्रम केल्यास कोणतेही आव्हान साध्य

परिश्रम केले की कोणतेही आव्हान साध्य करता येते. हेच त्याने दाखवून दिले आहे. सारे काही सुसज्ज असतानाही सीएच्या परीक्षेत पाच ते सहा वेळा प्रयत्न करूनही उत्तीर्ण होणे अवघड असते. मात्र मल्लिकार्जुनने प्रतिकुल परिस्थिती आणि खडतर परिश्रम यातूनही यशाची वाट चोखाळली आहे.

Related posts: