|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » ऍपल वाढविणार भारतीय रेल्वेची गती

ऍपल वाढविणार भारतीय रेल्वेची गती 

600 किमी प्रतितास धावण्यास करणार मदत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. भारतीय रेल्वे  प्रतितास 600 किमी वेगाने धावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलची मदत घेण्यात येत आहे. अमेरिकन कंपनी ऍपलच्या मदतीने भारतीय रेल्वे वेगाची पुढील पातळी गाठेल असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले.

रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या 18 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला नीति आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-कोलकाता या देशातील सर्वात व्यस्त असणाऱया कॉरिडॉरवरील गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात येणार आहे. हा वेग वाढविण्यास मंजुरी देण्यात आल्याने गतिमान एक्स्पेस ताशी 200 किमी वेगाने धावेल असे त्यांनी म्हटले. असोचॅमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते.

रेल्वेचा वेग वाढल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. याचा फायदा देशाला होणार आहे. भारतीय रेल्वेचा वेग 600 किमी प्रतितास करण्यासाठी सरकारने ऍपलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील या प्रसिद्ध कंपनीचे कर्मचारी गेल्या सहा ते आठ महिन्यापासून या नवीन प्रकल्पावर काम करत आहेत. हे नवीन तंत्रज्ञान फक्त भारतात आयात करण्यात येणार नाही, तर आपल्या देशात ते सहकार्याने तयार करण्यात येईल. भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा या देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अपघात रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असे प्रभू यांनी म्हटले.