|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्यास मशाल मोर्चा काढणार

पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्यास मशाल मोर्चा काढणार 

प्रतिनिधी/ म्हापसा

हळदोणे भागात दरदिवशी खंडित वीजपुरवठा होत आहे. यासंबंधी काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हापसा वीज खात्याचे अभियंता आर. के. चंद्रन यांना घेराव घालून जाब विचारला. यापुढे हळदोणा भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यास आम्ही मशाल मोर्चा काढून कार्यालयात घुसणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

गेल्या चार पाच दिवसापासून हळदोणे भागात दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. या भागात नागरिकांकडून संतापाची लाट पसरली होती. हा प्रश्नही स्थानिक आमदार ग्लेन टिकलो यांनी विधानसभेत उपस्थित केला असता वीजमंत्र्यांनी भूमिगत वाहिनी घालण्याचे आश्वासन दिले होते.

अभियंत्यांना निवेदन सादर

 आश्वासन देऊनही व स्थानिक आमदारांनी प्रश्न उपस्थित करूनही शुक्रवारी सकाळी परत वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हापसा वीज खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून त्यांना एक निवेदन सादर केले.

हळदोणा भागाचे सर्वेक्षण करण्याची मागणी

 विजेची बिले वाढीव येतात, काही ठिकाणी दिवसाही वीज दिवे पेटत असतात, काही वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. लाईनमन उडवाउडवीची उत्तरे देतात. खात्यात फोन केल्यास कुणीही उचलत नाही, अशा अनेक तक्रारीचा पाढाच यावेळी वाचण्यात आला. नवीन एलईडी लाईट घालून त्या जागी असलेले बल्ब बाहेर गटारात टाकले जातात. लाईनमन योग्यरित्या लक्ष देत नाहीत. अभियंता वार्गांनी या भागाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हळदोणात दररोज वीजेचा लपंडाव होतो. कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत. आम्हाला येथे राजकारण नको. गावातील नागरिकांना चांगली सेवा द्या व योग्य न्याय द्या, असे यावेळी ज्यो रोझ म्हणाले.

व्यापारी, विद्यार्थ्यांना त्रास

हळदोणा येथे 17 रोजी पासून सलग पाच दिवस वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे व्यापाऱयांना बराच त्रास सहन करावा लागला. शाळकरी, कॉलेज विद्यार्थ्यांना ऐन परीक्षांच्या दिवसात त्रास सहन करावा लागला, असे यावेळी अमरनाथ पणजीकर म्हणाले. यावेळी महाबळेश्वर तोरस्कर, आश्वीन डिसोझा, मिलाग्रीस करनेटो आदी मान्यवर उपस्थित होते.