|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जुन्या नोटा प्रकरणाची सूत्रधार महिला

जुन्या नोटा प्रकरणाची सूत्रधार महिला 

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या 10 दिवसांपूर्वी नेहरुनगर येथील एका हॉटेलमधून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी 11 लाख 50 हजार रुपयांच्या जुन्या नोटा प्रकरणाच्या तपासाला कलाटणी मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार राजकारणामध्ये सक्रिय असलेली एक महिला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तपास अधिकाऱयांनीही त्या दिशेने तपासाची चपे फिरविली आहेत.

10 जुलै 2017 रोजी सायंकाळी नेहरुनगर येथील रोहन रेसिडन्सी या हॉटेलवर छापा टाकून सीसीबीच्या अधिकाऱयांनी बेळगाव, पुणे, मिरज, भटकळ येथील सहा जणांना अटक केली होती. त्यांच्या जवळून 3 कोटी 11 लाख 50 हजार रुपये इतक्मया 500 व 1000 च्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या. या नोटांचे मूळ शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच राजकारणात सक्रिय असलेल्या एका महिलेचे नाव ठळकपणे चर्चेत आल्याने प्रकरणाच्या तपासाला कलाटणी मिळाली आहे.

 सहा जणांच्या चौकशीतही ‘त्या’ महिलेचे नाव

अरविंद पुंडलिक तळवार (वय 33, रा. कोंडाप्पा स्ट्रीट कॅम्प), सुहास अशोक पाटील (वय 31, रा. कात्रज, पुणे), रामा भैरु पाटील (वय 29, रा. संभाजी गल्ली, हलगा-बस्तवाड), सद्दामहुसेन शब्बीर शेख (वय 28, रा. मिरज), अनिल जयंतीलाल पटेल (वय 29, रा. महांतेशनगर), अब्दुलनिसार महम्मदहक्क शेख (वय 46, रा. भटकळ) यांना अटक करण्यात आली होती. या सहा जणांच्या चौकशीतही त्या महिलेचे नाव सामोरे आले आहे.

महिलेने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या

सध्या एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पुणे, मिरज, भटकळ व गोवा येथे या महिलेने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. नव्या नोटांचे व्हीडीओ पाठवून आपल्या जवळ नव्या नोटा आहेत, तुम्ही जुन्या नोटा द्या, त्याच्या बदल्यात नव्या नोटा देण्यात येतील, असे सांगून या महिला नेत्याने जुन्या नोटा जमविण्यास सांगितल्या होत्या. या महिलेवर विश्वास ठेवून सहा जणांनी मोठय़ा प्रमाणात जुन्या नोटा बेळगावल्या आणल्या होत्या.

बनावट नोटाही आढळून आल्या

तीन कोटी अकरा लाख रुपयांमध्ये बनावट नोटाही आढळून आल्या आहेत. एसबीआयच्या अधिकाऱयांनी बनावट नोटा बाजूला काढून दिल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी त्या सहा जणांना पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.  एका महिलेचे नाव ठळकपणे चर्चेत आल्याने तपासाची दिशाच बदलली आहे. तपास अधिकाऱयांनाही याची माहिती मिळाली आहे. मात्र राजकीय दबावामुळे अद्याप त्या महिलेची चौकशी झाली नाही.

बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी असलेल्या या महिलेने पाठविलेल्या नव्या नोटांच्या व्हीडीओमुळे पुणे, मिरज, गोवा, भटकळ येथील तरुण फसले. मात्र यामागे त्या महिलेचा नेमका उद्देश काय होता? याचा उलगडा झाला नाही. संबंधित महिलेला ताब्यात घेवून तिची चौकशी केल्यावरच यासंबंधी अधिक माहिती उजेडात येणार आहे. मात्र राजकीय दबावामुळे पोलीस अद्याप त्या महिलेची चौकशी करीत नाहीत, असा संशय बळावला आहे.

बनावट नोटा प्रकरणी गुन्हा

शुक्रवारी सर्व सहा जणांना पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. न्यायालयाची परवानगी घेवून त्यांना शुक्रवारी एक दिवसासाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. त्यांच्यावर बनावट नोटा प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन सायंकाळी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.