|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

प्रतिनिधी / बेळगाव

कॉलेजमध्ये कोणतीही संघटना स्थापन करू नये, असे वक्तव्य शिक्षणमंत्री तन्वीर सेठ यांनी केले. त्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्याचा निषेध केला. आम्हाला घटनेने अधिकार दिले आहेत. ते अधिकार हिसकावून घेण्याचा हक्क कोणालाच नाही. तेव्हा आम्ही त्यांचा तीव्र निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पदवीपूर्व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी संघटना स्थापन केली जाते. विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठीच ही संघटना कार्यरत असते. घटनेनेच हा अधिकार दिलेला आहे. असे असताना काँग्रेस सरकार विद्यार्थ्यांचे हक्क काढून घेत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

अलीकडेच मंत्री तन्वीर सेठ यांनी विद्यार्थी संघटना कॉलेज कॅम्पसमध्ये स्थापू नयेत, असे वक्तव्य केले आहे. ते चुकीचे असून त्यांना कोणताच अधिकार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे बारावीची पुस्तके महिना उलटला तरी अद्याप देण्यात आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा तातडीने पुस्तके द्यावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजय चंद्रपट्टण, भीमसेन पप्पू, रितेश, शिवानंद सैदापूर, पृथ्वीकुमार यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.