|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » प्रेक्षकांच्या सेवेत ऑन डय़ुटी, ‘शेंटिमेंटल’!

प्रेक्षकांच्या सेवेत ऑन डय़ुटी, ‘शेंटिमेंटल’! 

भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची लगबग हे कोणत्या पोलीस चौकीचे वर्णन नाही तर मुंबई येथे पार पडलेल्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या संगीताचे लोकार्पण हृद्य सोहळय़ाचे वर्णन आहे. हृद्य सोहळा कारण या सोहळय़ात आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणं लागतो असा विचार करून समाजासाठी सतत कार्यरत असणाऱया डॉ. अर्चना सारडा, डॉ. राजेश सिन्हा, डॉ. राजगोपाल कालानी, रॉनी जॉर्ज, जयवंत वाडकर, मेधा मांजरेकर, सुगंधा लोणीकर, नितीन वैद्य आणि डॉ. उदय निरगुडकर या नऊ कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा महाराष्ट्र राज्याचे डी. जी. एस. आर. पी. एफ. संदीप बिष्णोई, किरण वळसे-पाटील आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते ‘शेंटिमेंटल’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे संगीत प्रदर्शितही करण्यात आले.

अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई. सी. एम. पिक्चर्स द्वारे निर्मित, आर. आर. पी. कॉर्पोरेशन, बनी डालमिया प्रस्तुत आणि समीर पाटील लिखित दिग्दर्शित ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून पोलिसांमधील माणसाची गोष्ट सांगण्यात आली आहे. विषय कितीही गंभीर असला तरी त्यावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करत अंतर्मुख व्हायला लावणे ही समीर पाटील यांची खासियत आहे. मग ‘शेंटिमेंटल’ तरी याला अपवाद कसा असेल! केवळ एका वेगळय़ा विषयावरचा चित्रपट एवढेच या चित्रपटाचे वैशिष्टय़ नसून समीर पाटील यांच्या लेखणीतून उतरलेले खुसखुशीत संवाद, ठेका धरायला लावणारी आणि गुणगुणत रहावी अशी गाणी या चित्रपटाचा आत्मा आहेत. ही गाणी मिलिंद जोशी, दासू वैद्य, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत आणि मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून त्यातील एका गाण्यात दिवस रात्र, वेळ काळ न बघता कार्यरत राहणाऱया पोलिसांचा संसार पोलीस चौकीशीतच कसा बांधला गेलेला असतो याचे चित्रण करण्यात आले आहे. या गाण्यांना अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान, निहिरा जोशी देशपांडे, पावनी पांडे यांचा आवाज लाभला आहे.

मुंबई पोलिसांच्या इंटरस्टेट ऑपरेशनची कथा सांगणाऱया ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटात विनोदाच्या अचूक टायमिंगद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱया अशोक सराफ उर्फ मामांची प्रमुख भूमिका आहे. अशोक सराफ यांच्यासोबतच उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱहे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी हे कलाकार देखील वेगवेगळय़ा अतरंगी भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या 28 जुलै रोजी शेंटिमेंटल प्रदर्शित होणार आहे.