|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नातूनगर धरणात 18 द.ल.घ.मी. पाणीसाठा

नातूनगर धरणात 18 द.ल.घ.मी. पाणीसाठा 

प्रतिनिधी/ खेड

सलग चार दिवस झालेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या नातूनगर धरणात मुबलक पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत धरणात 18 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून टक्केवारी 68 टक्के इतकी असल्याची माहिती प्रकल्पाचे उपअभियंता गोविंद मंगले यांनी दिली.

या नातूनगर धरणातून शहराला पाणीपुरवठा वितरित होतो. उन्हाळय़ात 2 महिने मात्र शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित करून रब्बी हंगामासाठी पाणी वित्क्करित केले जाते. या धरणांतर्गत 17 गावांनाही पाणीपुरवठा होत असतो. याशिवाय या धरणातून नातूनगर, उधळे, कळंबणी, भडगाव, मुरडे, आंबये, चिंचवली, खवटी आदी गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. 27.23 द.ल.घ.मी. पाणीसाठय़ाची क्षमता असलेल्या नातूनगर धरणात 30 जूनअखेर 12 द.ल.घ.मी. इतकाच पाणीसाठा होता.

यंदा झालेल्या कालव्यांच्या दुरूस्तीमुळे धरणात गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा झाला होता. त्यातच गेले सलग 4 दिवस तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे धरण तुडूंब झाले. सद्यस्थितीत धरणात 18 द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. 92.50 मीटर इतकी पाण्याची पातळी असलेल्या धरणात सद्यस्थितीत 87.80 मीटर इतकी पाण्याची पातळी झाली आहे. या धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस पडत असतो. सद्यस्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने 5 ऑगस्टपर्यंत धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात येणार आहेत. या धरणाचे कालवे पक्के व सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.