|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘तुझ आहे तुझ पाशी’ ने दाखविला जीवनाचा खरा रंग

‘तुझ आहे तुझ पाशी’ ने दाखविला जीवनाचा खरा रंग 

प्रतिनिधी / कोल्हापूर

 पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुजपाशी’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग डॉक्टर्स ड्रामा ग्रुपच्या कलाकारांनी रविवारी सायंकाळी सादर केला. तुझं तुझ्यापाशीच आहे, ते दुसऱयांकडे शोधण्याची गरज नाही, असा संदेश देणाऱया या नाटकात डॉक्टर कलाकारांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. शिवाय प्रतिज्ञाच्या विनंतीला मान देत या नाटकातील कलाकारांनी विनामोबदला हा नाटय़प्रयोग सादर केला. दरम्यान, प्रतिज्ञा नाटय़रंगने या नाटकातून जमलेला निधी दिशा ऍकॅडमी या निवासी शाळेत शिक्षण घेणाऱया आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी ऍकॅडमीकडे सुपूर्द करत सामाजिक बांधिलकी जोपासली.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात प्रतिज्ञा नाटय़रंगच्यावतीने या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे यांच्या ग्रंथ संपदेतील एक उत्तम नाटक म्हणजे ‘तुझे आहे तुजपाशी’. या नाटकाने पु. लं. च्या या नाटय़कृतीला सांगलीच्या डॉक्टर्स ड्रामा ग्रुपच्या कलाकारांनी उत्तम न्याय दिला आहे. ‘तुझ आहे, तुझ पाशी… परी जागा तु चुकलाशी’ यातील जागा चुकण्याच्या ‘जागा’ या नाटकात दाखवल्या आहेत.  समाजातील प्रतिष्ठित व लोकप्रिय असलेले आचार्य हे आपल्या आचार्यपणामध्ये गुरफटून गेले आहेत की, त्यांना सत्य सांगणं हे कठिण जात आहे. आचार्यपणाचे ओझं स्वतः स्वीकारल्यामुळे आयुष्य वाहून नेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. तर दुसरीकडे निसर्गाशी एकरूप राहून सत्यवादी व तत्वज्ञानी असणारे काकाजी यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टि निर्दोष आहे. यातून ते निखळ आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. लोक काय म्हणतील, याचा ते विचार करत नाहीत. शेवटी यात आचार्य जमिनीवर येतात आणि त्यांचे मन परिवर्तन होत. या नाटकात दोन परस्परविरोधी पात्रे बखुबीने वठवण्यात आली आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. विश्राम लोमटे यांनी केले असून निर्मिती सहाय्य डॉ. दयानंद नाईक, नेपथ्य मिलिंद अष्टेकर व सागर भोसले, प्रकाश योजना रोहन घोरपडे यांची आहे. या नाटकात डॉ. विलास कुलकर्णी, सारिका कुल्लोळी, धिरज पलसे, डॉ. विश्राम लोमटे, डॉ. शिल्पा दाते-काळे, डॉ. शुभांगी लिमये, श्रीनिकेतन काळे, श्रीकांत वसवाडे, डॉ. सीमा साठे, डॉ. सचिन शेटी् व डॉ.प्रा. जया कुऱहेकर हे आपआपल्या भुमिकांना योग्य न्याय देण्यात यशस्वी ठरले आहेत. यावेळी राजेंद्र चौगुले, सतीश साळोखे, संजय जोग, प्रवीण लिंबड आदी उपस्थित होते.

 दिशा ऍकॅडमीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत निधी सुपूर्द

दरम्यान, प्रतिज्ञा नाटय़रंगच्यावतीने फुलले रे… क्षण माझे…फुलले रे…आणि  ‘तुझे आहे तुजपाशी’ हे दोन कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमातून जमलेला सुमारे 15 हजार रूपयांचा निधी बाचणी येथील दिशा ऍकॅडमी या निवासी शाळेत शिक्षण घेणाऱया आर्थिक मागासवर्गातील दहा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, हा निधी ऍकॅडमीचे सेक्रेटरी अजित पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Related posts: