|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इचलकरंजीत पंचगंगेची पाणीपातळी स्थिरावली

इचलकरंजीत पंचगंगेची पाणीपातळी स्थिरावली 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

       शनिवारपासून पावसाने दिलेली उघडीप व धरणक्षेत्रातुन पाण्याच्या विसर्ग कमी प्रमाणात होत असल्यामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदिची पाणीपातळी स्थिरावली आहे. रविवारी दिवसभरात पाणीपातळीत केवळ तीन इंचाने वाढ होवुन पाणीपातळी 65 फूट 4 इंचावर पोहोचली आहे.

गेले काही दिवस सुरु असणाऱया मुसळधार पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी झापाटय़ाने वाढत होती. बुधवार पासुन तीन दिवसांतच   ही पाणी पातळी 65.1 इंचावर जावून पोहोचली होती. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजीचा जुना पुल वाहतूकीसाठी बंद केला होता. शुक्रवारी हा पुलही पाण्याखाली गेला होता. केवळ तीनच दिवसांत वीस फुटाहून जास्त पाणीपातळी वाढल्याने नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली होती. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 68 फूट असुन 71 फूट ही धोक्याची पातळी आहे. अणखी काही दिवस पाऊस पडल्यास ही पातळी ओलांडली जाईल असा कयास होता. पण पावसाने शनिवारपासून थोडी उसंत दिल्याने व धरणक्षेत्रातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे शनिवारी रात्री केवळ 5 इंचाने पाणीपातळीत वाढ झाली. रविवारी मात्र इचलकरंजी शहरासह परिसरात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या तुरळक सरी वगळता  पुर्णपणे उघडीप होती. धरणक्षेत्रातूनही पाण्याचा विसर्ग कमी असल्याने रविवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाण्याची पातळी केवळ तीन इंचाने वाढली असून ती 65 फूट 4 इंचावर स्थिर राहिली आहे.

दरम्यान पाणीपातळी जरी स्थिर राहीली असली तरी जुना पुल अजुनही पाण्याखालीच आहे. त्यामुळे संपुर्ण वाहतूक ही नव्या पुलावरुन होत आहे. दुहेरी वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी होत असली तरी पोलिसांनी संपुर्णपणे नियोजन केले आहे. तसेच नदीघाटावरील स्मशानभूमी ही अजुनही पाण्याखाली असल्याने नागरिकांकडून शहापुर येथील स्मशानभूमीचा वापर केला जात आहे. गणपती मंदीर ही पाण्याखाली गेले असून तेथेही पाणीपातळी स्थिर आहे. रविवारची सुट्टी असल्याने नागरिकांची पूर पाहण्यास गर्दी होत आहे. काही ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात तरूणांकडून आततायीपणा होण्याचे प्रकार घडले आहेत.  तसेच जुन्या पुलाच्या रस्त्यावर पाणी  पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटस्च्या बाहेरील रस्त्यावर पाणी आल्याने बालगोपाल पाण्यात खेळण्याचा आनंद लुटत आहेत. पुरामुळे होणाऱया संभाव्य धोक्यावर वेळीच नियंत्रण ठेवता यावे यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे यांनी अविश्रांतपणे चोख व्यवस्था ठेवली आहे. नदिच्या तीरावर पालिकेच्या वतीने रुग्णवाहीका, फायर ब्रिगेडची गाडी यासह रबरी बोटी 24 तास तैनात केल्या आहेत.

 

Related posts: