|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटीच्या केबिनने घेतला पेट

एसटीच्या केबिनने घेतला पेट 

वार्ताहर/ आंबोली

सावंतवाडी-तुळजापूर बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन चालकाच्या केबिनने पेट घेतला. या दुर्घटनेतून चालक ए. ए. कुंभार, वाहक बनसोडे व 17 प्रवासी मिळून 19 जण बालबाल बचावले. वाहक बनसोडे तसेच प्रवाशांनी आग त्वरित विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळी नऊच्या सुमारास आंबोली मुख्य धबधब्याजवळ सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली. दोन दिवसापूर्वीच मळगाव येथे शिरोडा-सावंतवाडी बसमध्ये शॉर्टसर्किटची घटना घडली होती. पुन्हा तशीच घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, बसमधील प्रवाशांना अन्य बसने पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आले. बसमध्ये 17 प्रवासी होते. चालक, वाहक व प्रवाशांनी कॅरीबॅग, प्लास्टिकच्या बाटल्या यामधून पाणी भरून आग विझविली. ही घटना उन्हाळय़ात घडली असती तर पूर्ण बसने पेट घेतला असता.

सावंतवाडी आगाराची बस तुळजापूरला जात होती. सकाळी नऊच्या सुमारास आंबोली घाटात ही बस गेली असता बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाले. चालकाच्या केबिनने पेट घेतला. चालकाच्या कपडय़ांची बॅग, सीट व किटही जळाले. त्यानंतर चालक कुंभार यांनी वाहक बनसोडे व प्रवाशांच्या सहाय्याने आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

वाहतूक थांबविली

शॉर्टसर्किट होऊन बसने पेट घेतल्यानंतर मोठा अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही बाजूची वाहने काही काळ थांबवून ठेवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळाल्यावर ही वाहने सोडण्यात आली. मात्र, अचानक झालेल्या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शॉर्टसर्किट होऊन बसच्या केबिनने पेट घेतल्यानंतर आतील चालकाची बॅग व किट जळाले. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला होता. हा धूर काही अंतरापर्यंत फैलावला होता.

Related posts: