|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » येऊ दे महापूर, वाहू दे तुझं घर माझं घर

येऊ दे महापूर, वाहू दे तुझं घर माझं घर 

वार्ताहर/ देवगड

घर बांधायची नसतात देवळासारखी, घर जाळायची नसतात प्रेतांसारखी, नपेक्षा होऊ दे उद्ध्वस्त तुझं घर माझं घर, येऊ दे महापूर वाहू दे तुझं घर माझं घर… कवी उत्तम पवार यांच्या अशा एकापेक्षा एक परिवर्तन विचारांचा वेध घेणाऱया कविता सादर करत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत येथे विचाराची मशाल पेटवली गेली. निमित्त होते ते येथे आयोजित करण्यात आलेल्या कवी पवार यांच्या स्मृती काव्यजागर कार्यक्रमाचे.

देवगड-जामसंडे गोगटे विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आणि सृजनचे संपादक विजय जामसांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि देवगडच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक निरंजन घाडी, कवी अजय कांडर, लेखक महेश काणेकर, सामाजिक कार्यकर्ते डी.के.पडेलकर, राजेश कदम, सिद्धार्थ तांबे, प्रकाश जाधव, प्रदीप नाईक आदींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पवार यांच्या अकाली निधनाने तळकोकणच्या परिवर्तन चळवळीची मोठी हानी झाली, अशा शब्दात त्यांना अभिवादन करण्यात आले.

‘घर म्हणजे देश माणसांचा

माणसाने जोपासलेल्या माणुसकीचा

ना पंथाचा, ना कशाकशाचा

आपणच उभारावीत मंदिर-मशिद आणि सर्व

आणि म्हणावं सर्वधर्मसमभाव

देवळच बांधली तर माणसं राहणार कुठे?

घरच जाळली तर माणसं जाणार कुठे’?

पवार यांच्या अशा अनेक कविता सादर करण्यात आल्या. जाधव म्हणाले, बुद्धिजीवी कार्यकर्ता गेली पंचवीस वर्षे समाज एकसंघ ठेवण्यासाठी कशाप्रकारे काम करू शकतो हे आपण उत्तम यांच्या कामातून अनुभवले आहे. उत्तम कवी आणि कार्यकर्ताच नव्हे तर एक उत्तम माणूस होता. त्याची कविता परिवर्तनाची आस बाळगणारी होती

साळसकर म्हणाल्या, उत्तम पवार यांच्या जाण्याने चळवळीची हानी झाली आहे. त्यांनी जे काम केले ते पुढे घेऊन जाणे म्हणेजच त्यांच्या स्मृती जतन करणे होय.

कांडर म्हणाले, पवार हे कोणत्याही प्रसिद्धीपेक्षा विचाराची बांधिलकी महत्वाची मानत होते. त्यामुळेच ते खरे आंबेडकरवादी होते. माणसे आपल्यासोबत आणि आपल्या आजूबाजूला खूप असतात. पण ती सगळीच आपली असतात, असे नाही. आपली असली, तरी त्यांच्यामुळे आपली वैचारिक वाढ होतेच, असे नाही. उत्तम यांच्या सहवासामुळे किंवा त्यांच्या परिवर्तन चळवळीमुळे अनेकांची वैचारिक जडण-घडण झाली. उत्तम यांच्यासारख्या विचारशील व्यक्तीच्या अकाली जाण्यामुळे एखाद्या शहरात वैचारिक संवादासाठी तसा दुसरा सहकारी-मित्र मिळू नये, हीच अशा प्रगल्भ कवी-कार्यकर्त्याच्या निधनानंतरची कायमची शोकांतिका राहते…!

काणेकर म्हणाले, अक्षरसिंधुच्या निर्मितीपासून पवार यांच्या निधनापर्यंत आम्ही एकत्र काम केले. त्यांची समाजाबाबतची तळमळच त्यांना समाजासाठी काम करायला लावत होती. विचाराने काम करणे आणि विचारानेच जगणे या तत्वामुळेच ते कमी वयात मोठं काम करू शकले.

यावेळी पडेलकर यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी नीलेश जाधव, मिलिंद जामसांडेकर, प्रदीप कदम, सुनंदा कांबळे, सचिन जाधव, सिद्धार्थ तांबे, दिलीप कदम आदींनीही पवार यांच्या कवितांचे अभिवाचन केले.

प्रास्ताविक प्रदीप नाईक यांनी तर सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रकाश जाधव यांनी मानले.

Related posts: