|Friday, March 22, 2019
You are here: Home » क्रिडा » महिला संघाचा भव्य सत्कार होणार

महिला संघाचा भव्य सत्कार होणार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय महिला संघाचे शानदार गौरव समारंभ आयोजित करण्याची योजना बीसीसीआयने आखली आहे. निसटता पराभव झाल्यानंतर करोडो भारतीयांची निराशा झाली असली तरी उपविजेतेपद मिळविण्यापर्यंत त्यांनी जी चमक दाखविली त्याने तमाम क्रिकेटशौकिनांची मने जिंकली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मान्यवर, विविध खेळाडू, बॉलीवूड कलाकार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बुधवारपासून संघातील खेळाडू बॅचेसमधून भारतात परतणार आहे. त्यांच्या सत्कार सोहळय़ाचे ठिकाण व तारीख अजून निश्चित करण्यात आले नसून खेळाडूंची उपलब्धता पाहून ते ठरविण्यात येणार आहे. या सोहळय़ावेळी प्रत्येक खेळाडूला 50 लाखाचा तर साहाय्यक स्टाफला प्रत्येकी 25 लाखाचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना होण्याआधीच बीसीसीआयने हे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

या महिला संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात येत असून 12 वर्षांनंतर प्रथमच अंतिम फेरी गाठलेल्या या संघाची त्यांनीही मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. ‘अंतिम सामना त्यांनी गमविला असला तरी आपल्या चमकदार कामगिरीने त्यांनी देशाची मान उंचावली आहे. त्यांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. या संघाच्या सत्काराचे आयोजन बीसीसीआय लवकरच करणार असून पंतप्रधानांच्या भेटीची व्यवस्था करण्याचाही प्रयत्न आम्ही करीत आहोत,’ असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱयाने सांगितले.

‘भारतीय संघाच्या या कामगिरीने महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून त्याचा फायदा घेण्याचा विचारही बीसीसीआय व सीओए करीत आहे. यासाठी महिलांची आयपीएल स्पर्धा सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. याशिवाय मिथाली राजनेही एका मुलाखतीत महिलांची आयपीएल सुरू व्हावी, अशी इच्छा बोलून दाखविली होती. मात्र भारताचे पुढील लक्ष्य टी-20 विश्वचषक स्पर्धा असून पुढील वषीच ही स्पर्धा होणार आहे,’ असेही या पदाधिकाऱयाने सांगितले.

भारतीय महिला संघाला मध्यप्रदेशकडून 50 लाखाचे बक्षीस जाहीर

महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय महिला संघाला मध्यप्रदेश सरकारने 50 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

भारतीय महिला संघाला रविवारी जेतेपदासाठी झालेल्या लढतीत यजमान इंग्लंडकडून केवळ 9 धावांची पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपद मिळाले होते. येथे एका भव्य समारंभाचे आयोजन करून संघाला हे बक्षीस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केले. ‘एमपी सरकार बीसीसीआय महिला वर्ल्ड कप टीमचा भोपाळमध्ये भव्य कार्यक्रमात सत्कार करून 50 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे,’ असे चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

Related posts: