|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांवर कारवाईची मागणी

मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांवर कारवाईची मागणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास 15 टक्के कमिशन देतो, असे सांगून अथणी आणि परिसरात मैत्री ग्रुप ऑफ कंपनी या नावाने थाटलेल्या एका संस्थेने सुमारे 40 ते 45 कोटीची फसवणूक केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाविरूद्ध महाराष्ट्रात तक्रार दाखल झाली आहे. मात्र आपल्या राज्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेवून या संचालकांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली. जि. पं. सभागृहात झालेल्या केडीपी बैठकीत त्यांनी ही मागणी केली. यावर जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी तक्रार दाखल केल्यास या मंडळींविरूद्ध एफआयआर दाखल करा, अशी सूचना पोलीस अधिकाऱयांना केली.

अथणी येथे मैत्री ग्रुप ऑफ कंपनी या नावाखाली संस्था थाटून या भागातील निष्पाप जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. कंपनीत गुंतवणूक केल्यास 15 टक्के कमीशन (शेअर स्वरूपात) देणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळण्यात आली आहे. सुमारे 40 ते 45 कोटीची फसवणूक करण्यात आली असून यामध्ये अथणीसह रायबाग आणि गोकाक तालुक्यातील निष्पाप जनताही बळी पडली आहे. या फसरवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. मात्र येथील पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेवून या मंडळींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण सवदी यांनी यावेळी केली.

अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने बीपीएल कार्डधारकांना या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या पामतेलाचा मुद्दाही बैठकीत ऐरणीवर आला. कार्डधारकांना कालबाहय़ झालेल्या पामतेल पाकिटांचे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आल्याचे आमदार सवदी यांनी सांगितले. यावर खात्याच्या उपसंचालिका अफ्रीनबानो बळ्ळारी यांनी पामतेलाचे वितरण मार्चपर्यंत करण्यात आले होते. त्यानंतर वितरण बंद करण्यात आले. मात्र जुलैमध्ये पुन्हा पामतेलाचे वितरण करण्याची सूचना आल्याने शिल्लक असलेल्या पामतेलाचे वितरण करण्यात आले आहे. या पामतेलाच्या पाकिटावर जानेवारी 2017 अशी तारीख असल्याने कार्डधारकांत गोंधळ उडाला आहे. मात्र यामुळे कोणताही धोका नसल्याबाबत खात्री करूनच पामतेल पुरवठा करण्यात आल्याचे बळ्ळारी यांनी सांगितले.

यावर महांतेश कवटगीमठ यांनी त्यांना धारेवर धरले. एकदा कालबाहय़ ठरलेल्या पदार्थांचा तुम्ही सर्वसामान्यांवर प्रयोग करणार आहात का? या पामतेलाच्या सेवनाने बरेवाईट झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न केला. तसेच पामतेलाचे वितरण बंद करावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगून पामतेलाचे वितरण बंद करण्याची सूचना केली.

हेस्कॉमच्यावतीने राबविण्यात आलेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या अक्रम सक्रम योजनेत एजंटांचा सुळसुळाट सुरू असल्याचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. सदर एजंट हेस्कॉमच्या कार्यालयात जावून अर्जदारांची यादी घेवून संबंधीत अर्जदाराची भेट घेतात आणि त्यांच्याकडून पैसे घेवून कामे करून देतात. अथणी येथील हेस्कॉमचे केंद्र हे एजंटांचे केंद्र बनले आहे. शेतकऱयांकडून हे एजंट 25 ते 30 हजाराची मागणी करून या योजनेचा लाभ मिळवून देत आहेत. यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तर अन्य लोकप्रतिनिधींनी केवळ एजंटावर कारवाई न करता संबंधित अधिकाऱयांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली..

Related posts: