|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कंग्राळ गल्लीत आंबेडकर भवनचा उद्घाटन समारंभ

कंग्राळ गल्लीत आंबेडकर भवनचा उद्घाटन समारंभ 

बेळगाव / प्रतिनिधी

आपल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभा करण्यात आलेल्या भवनाचा सर्वांनी सदुपयोग करून घ्यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज आपल्याला मूलभूत हक्क मिळत आहेत. हे भवन उभारण्याची मोठी गरज होती. आता हे भवन उभारून तयार आहे. त्यामुळे या वास्तुचा येथील नागरिकांसाठी खासकरून महिलावर्ग व विद्यार्थ्यांसाठी उपयोग करण्यात यावा, असे विचार महापौर संज्योत बांदेकर यांनी मांडले.

त्या कंग्राळ गल्ली येथे महानगरपालिका बेळगाव व जयभीम युवक मंडळ यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर भवनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. सोमवार दि. 24 रोजी कार्यक्रम झाला. त्यावेळी अध्यक्षा या नात्याने त्या बोलत होत्या. या भवनामध्ये महिलांठी शिवणकाम, तसेच विविध कौशल्याची शिबिरे, संगणक प्रशिक्षण, लहान मुलांसाठी शिकवणी, ग्रंथालय आदी सुविधा करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर नागेश मंडोळकर, आमदार फिरोज सेठ, नगरसेविका माया कडोलकर, राजू सेठ, जयभीम संघटनेचे संस्थापक मल्लेश चौगुले, संघटनेचे अध्यक्ष गजानन देवरमनी, उपाध्यक्ष सिद्राय मेत्री, आर. एस. नाईक, सचिन कांबळे, हिरेमठ आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी केले. तसेच बुद्धम् शरणम् गच्छामी ही प्रार्थना म्हणण्यात आली.

यावेळी गल्लीतील कार्यकर्त्यांच्या व महिलावर्गांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मल्लेश चौगुले यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, 50 लाख रुपये खर्च करून ही भव्य अशी इमारत समाजातील नागरिकांसाठी उभी करून दिल्याबद्दल सर्वांचे स्वप्न साकार झाले आहे. आता या इमारतीचा वापर योग्यरीत्या करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करावयाचा असल्याचे सांगण्यात आले.

प्रास्ताविक दीपक देवरमनी यांनी केले. याप्रसंगी देवेंद्र चौगुले, तानाजी देवरमनी, राजू ईटकर, सुधीर चौगुले, आकाश हलगेकर, सुरेश कोलकार आदींसह जयभीम युवक मंडळाचे कार्यकर्ते, पंचमंडळी, युवकवर्ग, महिला आदी उपस्थित होते.  

Related posts: